याला जीवन ऐसे नाव!

मैत्रिणींनो! जीवनाच्या  वेगवेगळ्या टप्प्यांचा आपल्याला जास्त अनुभव येत असतो. प्रत्येक टप्प्याचं महत्त्व किती वेगळं असतं ते आपल्याशिवाय जास्त कोणालाच कळू शकत नाही. लहानपणी भातुकलीमध्ये रमणाऱ्या आपण, स्वतःच्या खऱ्याखुऱ्या भातुकलीच्या संसारात कधी रमून जातो कळतंच नाही. शाळा,कॉलेज, करिअर, लग्न,घर, संसार या प्रत्येक टप्प्यात आपण खऱ्या अर्थाने जगतो. माहेर-सासर दोन्ही घरं आपली मानायची त्यातही  adjustment ही आलीच. मनाप्रमाणे वागायचं ठरवलं तरी त्यात सर्व परिस्थितीचा विचार करावा लागतो आणि स्वेच्छेला अस्तित्त्व उरतचं नाही.

स्त्री पुढारली, प्रगत झाली, स्वतंत्र झाली, आज तिच्याभोवती असलेल्या बंदिवान भिंती निखळल्या खऱ्या, पण त्याची जागा घेतली ती काचेच्या भिंतींनी. वरकरणी सगळं व्यवस्थित दिसतं, पण आतला आवाज तसाच आहे का? माहित नाही. कधी एकदा ट्रेनमध्ये बसायला जागा मिळते आणि डोळे बंद होतायत, कधी एकदा घरातली कामं होऊन जरा एखादी डुलकी काढायला वेळ मिळतो. थोडस अंग टाकलं किंवा पडून राहिलं की कोणीतरी दाराची बेल वाजवणार, हे असचं होणार. जेव्हा पटतं नाही, काहीच करावसं वाटतं नाही, पण केवळ स्त्री आहोत म्हणून हे अनामिक कर्तव्य आपल्या वाटेला येतं, अगदी आपला पाठलाग करत आणि अशावेळी मनातला हुंदका मनातच राहतो. नोकरदार असलो, आयटीमध्ये अगदी ऐटीतली नोकरी असली तरी जेवण बनवता येतं का? मनमिळाऊ आहे का? गृहकृत्यदक्ष आहे का? अशा  पुरस्कारांनी ती सजली पाहिजे अशी अपेक्षा असतेच..घरच्यांची आणि समाजाची सुद्धा!

आता कुठल्याही परिस्थितीत मानसिकता बदलणं न बदलणं हा पुढचा मुद्दा, पण खरं सांगू का? या काचेच्या भिंती कधी कोसळतील हे माहित नाही, पण त्या काचेच्या पलीकडे मात्र खूप सुंदर जग आहे, ज्याचा आतूनही आणि बाहेर जाऊन देखील आपण मनमुराद आनंद घेऊ शकतो. मैत्रिणींनो! हे अस जगण्यातचं जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधूनि पाहे’!  संत रामदासांचा हा श्लोक खऱ्या अर्थाने मनावर बिंबवला पाहिजे. आजूबाजूला सर्वसुखी असं कोणीच नाही. प्रत्येकजण चांगल्या-वाईट परिस्थितीशी झुंजत असतो.  निराशेचा अंधार दूर व्हावा या  आशेवर आणि आजचा दिवस आनंदाने जगण्याच्या धडपडीमध्ये. त्यामुळे स्त्री म्हणून आपणच स्वतःला बंदिस्त करता कामा नये. कण्हत कण्हत न जगता, गाणं म्हणत जगायला  शिकवणाऱ्या मंगेश पाडगांवकरांनी आयुष्याचा आनंद कशात आहे हे अगदी सहजपणे पटवून दिले आहे. चला तर मैत्रिणींनो! सज्ज होऊया त्याच प्रवासात नवी वाट चोखाळण्यासाठी, तेव्हाच आपण म्हणून शकतो याला जीवन ऐसे नाव!

Designed and Developed by SocioSquares