cooking banner

अट एकच : घरकामात मदत करावी!

देश चालवणं अवघड आहेच, पण घरकामांचा भार हाकणं देखील तितकच कठीण आहे. रोज रोज तिच कामे, तेच वेळापत्रक, आठवडाभर, महिनाभर अन् वर्षानुवर्ष! या घरकामांतील महत्त्वाचा विभाग म्हणजे ‘किचन’, आपल्या संस्कृतीच्या मुळा खोडांत जघ्घडपणे रुजलेल्या पुरुषप्रधानतेला धक्का देत, किचनच्या आसपासही न फिरकणारी पुरुषमंडळी हल्ली हौशेने हॉटेल मॅनेजमेंट निवडतात. उत्तम आचारी किंवा शेफ बनून जगभरची पदार्थ यात्रा आवडीने शिकून घेतात आणि अगदी काही वर्षांत अनुभवी सुगरणीच्या वरताण जेवण बनवायला लागतात. पाश्चात्यांत ‘पुरुष’ आचारी असणं काही वावगं नाही, उलट स्वयंपाकाला छंद म्हणवून किचनची जबाबदारी दोघेही आलटून पालटून सहज स्विकारतात.

आपल्याकडेही शेफ बनण्याची लाट आली आणि मुलींपेक्षा मुलांची संख्या या क्षेत्रात अधिक दिसू लागली. हा बदल नक्कीच सुखकारक आहे. यामुळे, किचनमधील कामांवर ‘बाईकी’ कामांचा बसलेला शिक्का तरी हळूहळू पुसला जाईल. दोन्ही संस्कृतींमधल्या किचन कामावरच्या मोघम निरिक्षणावरुन वाटतं,  आता मुली घोड्यावरुन येणा-या राजकुमाराची नाही, तर उंची टोपीवाल्या शेफची स्वप्न पाहात असाव्यात. असा नवरा मिळाला, तर काय आनंद! रोज नाही, पण किमान कधीतरी आयतं ताट समोर येईल. किचनमधून आठवड्यातून एखादी सुट्टी मिळेल. घरच्याघरी निराळ्या चवीचं शिजेल. पण, प्रत्येकीचा राजकुमार घोड्यावरुन येत नाही, तसा टोपीवाला शेफही प्रत्येकीच्या नशीबात बसत नाही. तेव्हा, पहिले पाढे पंच्चावन्न!

“जेवणानंतर स्वत:चे ताट उचलले तरी पुरे”, “भाजी ताजी की शिळी ते ओळखता येत नाही”, “मुलांचा अभ्यास माझ्याकडेच”, “स्वच्छता फक्त माझाच ध्यास”, “साधा कपही विसळत नाहीत कधी” अशा निरुत्साही कहाण्या ऐकून मोठ्या झालेल्या मुली, आगाऊ म्हणा किंवा सडेतोडपणे नव-यामुलाला एक अट घालतात, ‘घरकामांत मदत करण्याची अट’! दोघंही नोकरी करतो, दोघंही कमवतो, घर दोघांचं, मग घरकाम एकटीचं कसं? असं म्हणत, किचनपासून थेट कपडे वाळत घालणे-सुकलेले घडी घालणे, घराची साफसफाई, वाण सामान, बीलाच्या तारखा, मुलांच्या अभ्यासाचे विषय, पालक सभा, स्नेहसंमेलने सा-या जबाबदा-या वाटून घेतात.

यामुळे, घरातील बच्चेकंपनी हे आईचे काम, हे बाबांचे काम अशी विभागणी करीत नाही. ‘घर प्रत्येकाचे, घराकामही प्रत्येकाचे’ या नियमानुसार घरातील एकट्याबाईवर कामाचा भार पडत नाही. दिवसासोबत कामेही संपतात. घरच्या, जमीनीच्या वाटण्या किती आतताईपणे होतात, पण कामांच्या वाटण्या? त्या आधी व्हायला हव्यात, कदाचित यामुळे बायकांचा अतिरिक्त कामामुळे त्रागा होणार नाही. त्यामुळे, नव-याने घरकामात मदत करावी अशी अट घातली तर कुठे बिघडले?

कळवा तुमची मते ब्लॉगखालील कमेन्टबॉक्समध्ये, चला थोडी चर्चा करु!

More Articles
Designed and Developed by SocioSquares