Mother'sWork (1)

आई झाल्यावर ‘स्व-वेळ’ लुप्त होते, अचानक!

आई होण्याच्या चाहूलीनेच स्त्री मनोमन सुखावते. आनंद, उत्साह, थोडी हुरहूर, थोड्या दडपणासोबत जबाबदारी वाढणारसं कळू लागतं. आई झाल्याशिवाय आईपण उमजत नाही आणि ते अनुभवताना स्वत:ला कधी विसरलो हे समजत नाही. बाळाच्या हाकेला क्षणार्धात ओ देण्याची इतकी सवय लागते, की हळूहळू स्व मनाची हाक ऐकू येणंच बंद होतं. बाळ विश्वात गढून गेलेल्या आई मंडळींनी थोडी उसंत घ्या आणि सांगा तुमचे आईपण हेच आहे ना…?

आई झाल्यावर प्रत्येक कामाला थोडा जास्तीचा वेळ लागतो. जे काम पूर्वी १० मिनिटात व्हायचे तेच आता अर्धा तास घेते. कारण, स्वत:सोबत मुलांनाही न्हाऊ, जेऊ-खाऊ घालणे ओघानेच आलेले असते. खा, प्या, झोपा इतकाच कारभार करणा-या तान्ह्याबाळापाठी आईचा मात्र संपूर्ण दिवस जातो. ते झोपल्यावर जरा शांत बसावं, तेच बाळ रडतयं असा भास होतो. साधं अंघोळीला गेलं, तरी बाहेरुन बाळ रडण्याचा आवाज ऐकू येतो; गंमत म्हणजे बरेचदा हाही भासच असतो. आई किती बाळमय होतो.

मुलगी कितीही शिकलेली का असेना, तिला पुन्हा शाळेचं रहाटगाडगं अनुभवावं लागतं आई झाल्यावर. मुलांसोबत त्यांचा अभ्यास, टिफिन बॉक्स, नेटका युनिफॉर्म, ट्युशन्स, पालक सभा, परिक्षा, खेळ, स्पर्धांसाठी मुलांना प्रोत्साहन देण्यात तिला तिच्या छंदांचा कायमचा विसर पडतो. शाळा कॉलेजांतील ऍक्टिव्हिटीत हिरिरीने सहभागी होणारी ती, नंतर कॉलनीतली पूजा सोडून कितीश्या उपक्रमांत सहभागी होते.

नव-याकडे लाडीक हट्टकरणारी ‘ती’, आई झाल्यावर हळूच स्वत:च्या इच्छांना मुरड घालू लागते. विंडो शॉपिंगमध्ये एखादा ड्रेस मनात भरतो. त्यासाठी थोडी रक्कम राखून ठेवते, तर तीच रक्कम मुलांच्या हट्टापुढे वापरावी लागते.

आईचं सगळं जीवन व्यापून जातं मुलांच्या अस्तित्त्वाला आकार देता देता. तिही त्यात खूष असते. कारण, तिला जाणवतही नाही, की आपण दिवसाचे २४ तास फक्त मुलांमागे पळतोय. नोकरी सोडून घर सांभाळण्याचा निर्णय मुलांसाठी आणि नोकरीकरुन घर साभांळण्याचा निर्णयही मुलांसाठीच! इतके करुन कधी मुलांनी तिचे मन दुखावले, की ती हिरमुसते आणि मुलांमागे धावण्यात आपण स्वत:ला किती मागे सोडलंय हे तिचं तिलाच कळतं. असे वाटू नये म्हणूनच, प्रत्येक आईनं स्वत:साठी जगतं राहायला हवं. आई होण्यातली सुखदता, कर्तव्यानिशी जरूर अनुभवावी, पण स्वत:ला न विसरता. म्हणूनच, प्रत्येकीनं मनाशी म्हणावं, “मी आधी एक स्त्री आहे, मलाही मन आहे, माझ्याही आवडी आहेत, काही इच्छा आहेत, छंद आहेत ते कायम जापासेन, आई झाले तरी स्वत:चं अस्वित्त्व टिकवेन.”

More Articles
Designed and Developed by SocioSquares