SUN (1)

उन्हाच्या झळा न लागो घराला!

हिवाळ्यानंतर येणारा कडक उन्हाळा त्रासदायक वाटला तरी शेतीसाठी व निरोगी आरोग्यासाठी गरजेचाच आहे. उत्तम प्रतीचे धान्य बाजारात येण्यासाठी तसेच, सर्वत्र स्वच्छ व प्रसन्न वातावरणाची निर्मिती व्हावी यासाठी उन्हाळा तर हवाच! असा ऋतू बदल झाला, की वातावरणासोबत आहारात आणि राहणीमानातही बदल होतो. उन्हाळी फळे व भाज्यांचा आहारात जितक्या आग्रहाने आपण समावेश करतो, तितकेच लक्ष द्यायला हवे लाडक्या घराच्या देखभालीकडे!

प्रथम हाती घ्यावे घराच्या स्वच्छतेचे काम! हिवळ्यातील गारठ्यापासून संरक्षण देणा-या रझया, चादरी, लोकरीचे कपडे स्वच्छ धुवून पुन्हा जागच्याजागी ठेवल्यावर पडदे, उश्यांची कव्हरे बदलताना गडदरंगापेक्षा फिकटरंगाची निवड करावी. हॉलमधील एखाद्या कोप-यात शोभिवंत व सुवासित फुलांनी सजलेली फुलदाणी ठेवावी. खरी फुले शक्य नसल्यास कागदी किंवा कापडी फुलांचा पर्याय निवडावा.

इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे ओव्हन, वॉशिंग मशीन अशा वस्तूंची सर्व्हिसिंग करुन घ्यावी. फ्रिज स्वच्छ करताना फ्रिजरमधील संपूर्ण बर्फ वितळू द्यावा, तसेच साठवलेले पदार्थ वापरण्याची मर्यादा दर्शवणारी तारीख तापसून घ्यावी. खराब झालेल्या किंवा नको असलेल्या वस्तू बाजूला काढत, उन्हाळ्यासाठी विविध चवीच्या सरबतांनी फ्रिज सजवावा.

तसेच, गडद रंगापेक्षा फिके रंग ऊन परावर्तित करीत असल्याने मुख्यत्वे फिक्या रगांचे कपडे वापरावेत. कपाटामध्ये सुती कपडे खास उन्हाळ्यानिमित्त छान रचून ठेवावेत. ज्यामुळे, कपाट उघडताच हे फ्रेश रंग तुमचे मन प्रसन्न करतील.

वातावरणातील गरम हवा खेळती रहावी यासाठी दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवाव्यात व उन्हाला अटकाव घालण्यासाठी पडद्यांचा वापर करावा जेणेकरुन सततचे ऊन लागून खिडक्यांजवळील फर्निचर, सोफा तत्सम वस्तू खराब होणार नाहीत.

अशाप्रकारे, विविध त-हेने घरातील वातावरणाला नवा रंग देऊन उन्हाळ्याचा आनंद घेण्यासाठी तयार होऊया. दिवसभराच्या धावपळीनंतर घरी परतल्यावर चार हसत्या खेळत्या भिंतींतही थकवा दूर करण्याची ताकद असल्याने; सूर्याच्या प्रखरतेमुळे त्रासून न जाता स्वत:च्या वास्तूतील सकारात्मकता घेत आपणही टवटवीत राहूया!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares