heat banner

उष्माघात टाळण्यासाठी ‘हे’ करावे!

‘मे’ महिना, तर उन्हाळ्याचा अगदी हक्काचा! वाढता उकाडा, कडक ऊन, तापलेली हवा असे गरमागरम वातावरण तब्येत नरम करते. यामुळे, उष्माघात किंवा सनस्ट्रोक सारखे आजार उद्भवू शकतात. अचानक अशक्त, थकल्यासारखे वाटते, दम लागतो, भोवळ येते किंवा डोके दुखीचा त्रास सतावतो. घाम येण्याचे बंद झाल्याने त्वचा कोरडी पडून, लालबुंद होते.

अशा भयंकर उष्माघातापासून चार हात दूर राहायचे, तर उन्हाळ्यात तब्येतीकडे थोडं जास्तच लक्ष द्यायला हवं. दुर्लक्ष न करता शरीराला तंदुरुस्त बनविणा-या पुढील टिप्स लक्षपूर्वक वाचा.

  1. डिहायड्रेशनमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यावर उपाय एकच, भरपूर पाणी प्यावे आणि शक्यतो फ्रिजमधले गारेगार पाणी पिणे टाळावे.
  2. सब्जा घातलेले पाणी नियमित प्या. जेणेकरुन शरीराला थंडावा मिळत राहील.
  3. उन्हातून एसीत किंवा एसीतून लगेच उन्हात गेल्यास, शरीराला झटकन बदललेल्या तापमानाशी जुळवून घेणे कठीण जाते. हे ध्यानात ठेवावे.
  4. शक्यतो फिकट रंगाचे कपडे वापरावेत, गडद रंगाचे कपडे जास्त उष्णता शोषून घेतात. म्हणून, शांत रंगातील सूती कपडेच वापरावेत.
  5. उन्हात फिरताना पांढरा स्कार्फ किंवा डोक्याला पांढरा रुमाल बांधूनच घराबाहेर पडा.
  6. दही, ताकाचा आहारात समावेश करा व तेलकट तूपकट वर्ज्य करुन हलका आहार घेत रहा.
  7. लिंबूपाणी, कोकम सरबत किंवा कैरीचे पन्हे पिण्यावर भर द्यावा.
  8. कलिंगड, ताडगोळा, खरबूज, जाम अशी फळे भरपूर खावीत. दात मजबूत असणा-यांनी फळांचा ज्यूस पिण्यापेक्षा फळे खावीत. यामुळे, आरोग्याला फळांतील नैसर्गिक जीवनसत्त्वे थेट मिळतील.

दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळता येणार नसेल, तर किमान या वरील टिप्सचा विसर पडू देऊ नये. उष्माघात शरीराला आतून कमकुवत बनवतो. तेव्हा, दिवसभर ऑफिस किंवा घरकामासोबत स्वत:कडेही थोडे लक्ष द्या.

More Articles
Designed and Developed by SocioSquares