FAR (1)

करिअरसाठी घरापासून दूर रहाणा-या मुली!

नवी पिढी अभ्यासपूर्णरित्या स्वत:चे भविष्य घडवतेय. डॉक्टर, इंजिनियर पलिकडे करियरच्या नव्या वाटा धुंडाळून आवडीनुसार कमाईचा स्त्रोत निवडणा-यांची संख्या वाढली असून, शाळेत असतानाच
“मोठेपणी काय बनावे?” हे ठरवणारे आजचे विद्यार्थी ड्रीम जॉबचे स्वप्न मनी बाळगूनच कामाला लागलेत.

ध्येय साध्य करताना वेळ पडलीच, तर घरापासून दूर एखाद्या अनोळखी शहरात जाऊन रहाण्याचीही त्यांची तयारी असते. तरुणांसोबत तरुणमुलीही तितक्याच बिनधास्तपणे नव्या शहरात प्रवेश करु लागल्यात. हॉस्टेलवर किंवा पेइंग गेस्ट म्हणून चार पाच जणांमध्ये एखादी रुम घेऊन रहातात.

मुले वयाने कितीही मोठी किंवा स्वावलंबी झाली, तरी घरातल्यांसाठी ती कायम लहानच असतात यात शंका नाही. घरापासून दूर एकटे रहाणा-या तरुण मुलांच्या वागण्यावर जितके लक्ष ठेवावे लागते, तितकीच काळजी मुलींच्या पालकांना तिच्या सुरक्षिततेबाबत वाटते. यासाठी पावलोपावली सतर्कता बाळगावीच, सोबत नव्या टेक्नोलॉजीशी घट्ट मैत्री करावी. त्याविषयी सविस्तर माहिती देणा-या पुढील टिप्स!

 1. अगदी सातासमुद्रापार रहाणा-या व्यक्तिशी क्षणार्धात संपर्क साधणा-या फोन सेवेचा प्रत्येकजण वापर करतोच. मात्र बहुतांश पालक फोन उचलणे किंवा फोन करणे इतकेच शिकून घेतात. त्यापलिकडे उपलब्ध असणारे नवतंत्रज्ञानही पालकांना सराईतपणे वापरता यायला हवे.
 2. दूर रहाणा-या व्यक्तीसोबत दिवसातून एकदा व्हिडीओ कॉल केल्यास, साध्या कॉलपेक्षा समोरासमोर बसून गप्पा मारण्याचा आनंद मिळेल.
 3. फोनमधील लोकेशन ट्रॅकींगसारखे अॅप वापरुन, फोन न करताही व्यक्तिच्या सुरक्षित असण्याचा अंदाज घेता येऊ शकतो. संकटकाळी किंवा साधा रस्ता चुकलो तरी असे सेफ्टी अॅप्स महत्त्वाची कामगिरी बजावतात.
 4. मुलांच्या मित्रमंडळींविषयी देखील तितकीच माहिती पालकांना असावी. त्यांचे संपर्क क्रमांकही नोंदवून ठेवावेत.
 5. सध्याच्या काळात स्त्रियांच्या नशीबी येणा-या अघटीत घटना पाहाता, मुलींनी अनोळखी शहरात एकटे रहाताना जाणीवपुर्वक स्वसुरक्षेची काळजी घ्यावी.
  1. घर घेण्याआधी घराचा परिसर नीट पारखून घ्यावा.
  2. शेजा-यांविषयी अनभिज्ञ राहू नये.
  3. दरवाज्याला आय होल हवेच.
  4. सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरा असल्यास उत्तम, तसेच घरामध्ये व्हिडीओ डोअर फोन बसवावा.
  5. सुरक्षिततेसाठी घरात कुत्रा पाळणे सोयीचे ठरेल.

अशाप्रकारे, घरातील कुणीही सदस्य मुख्यत्वे स्त्री, जगाच्या पाठीवरील कुठल्याही अनोळखी शहरात एकट्यानं रहात असली, तरी वरील उपायांच्या सहाय्याने पालकांना त्यांच्या सुरक्षिततेची खात्री बाळगता येईल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares