काळ्या मातीतली डौलदार मराठी!

काळ्या मातीतली डौलदार मराठी!

मराठी साहित्याला आपल्या जादुई लेखनशैलीद्वारे वाङ्मयाचा नजराणा बहाल करणारे वि.वा.शिरवाडकर म्हणजेच, लेखक विष्णू वामन शिरवाडकरांचा २७ फेब्रुवारी जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यांच्या बालवयाची प्रथम काव्याशी मैत्री जमली आणि १९३० साली ठाकरसी महाविद्यालयात असताना ‘रत्नाकर’ या मासिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. या कवितांसोबत, कांदबरी, कथा, नाटक, ललित लेख तसेच प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी, नवयुग या वृत्तपत्रांद्वारे त्यांनी पत्रकाराची भूमिकाही बजावली. ‘कुसुमाग्रज’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या सा-या काव्यरचना आजही वाचकांना भुरळ पाडतात.

आज विविध मराठी वाङ्मय मंडळे, महाविद्यालये, शाळांतून अमृताहूनी मधूर असणा-या आपल्या मराठी भाषेचा कौतुक सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडेल. काव्यवाचन, अभिवाचन, लहान मोठ्यांसाठी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धांसोबत ‘मराठी भाषा’ या विषयीवरील चर्चात्मक कार्यक्रमही नव्या जुन्या विचारांची मांडणी करतील. सर्व सृष्टीमध्ये ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ या गीताचे सूर निनादू लागतील, मात्र या बाह्य कार्यक्रमांसोबत प्रत्येकाच्या अंतरात एक ‘आनंदसोहळा’ साजरा व्हायला हवा.

दिवसेंदिवस मराठी शाळांची कमी होत चाललेली संख्या, स्थानिक पातळीवर व्यवहारी भाषेचा वाढलेला वापर, मराठी भाषेकडे दुय्यम नजरेने पाहाणारे अशा त्रुटी जाणवू लागल्या, तरी मराठी प्रेमींना भाषेविषयी वाटणारा अभिमान दैनंदिन जीवनातूनही जपता येईल. मराठी भाषा लोप पावेल अशी भिती न बाळगता, आपण हसत खेळत तीला घरातील नव्या पिढीमध्ये रुजवू शकतो. यासाठी, मराठी बालासाहित्यातील छोट्या कथा, बडबड गाणी त्यांचे मनोरंजन करतील व त्यांनाही लहानवयात वाचनाची गोडी लागेल. आज इंग्रजी माध्यमांत शिकणा-या मुलांची संख्या अधिक असून, बालवाडीपासूनच त्यांच्यासाठी इंग्रजी भाषा प्रथमस्थानी येऊन, मराठी फक्त घरात बोलण्यापुरती वापरली जाते, पालकांना रुखरुख लावणा-या या समस्येवरील उपाय म्हणजे ‘पुस्तकं’!

महाराष्ट्रातील साहित्यिकांची मांदियाळी पाहाता, या भूमीस लाभलेला समृद्ध वारसा जपण्याची आपली जबाबदारीही लक्षात येते. अभंग, ग्रंथ, कथा, कादंब-या, कविता, आत्मचरित्र अशा उत्तमोत्तम रचनांनी सजलेल्या पुस्तकांची घरात रेलचेल असली, की मराठी भाषेवर प्रेम करणारी पुढची पिढीही सहज तयार होईल. संभाषणात मराठी भाषेला प्राधान्य दिल्यास, संवाद साधणा-या दोन व्यक्ती मराठी बोली अवगत असणा-या असूनही हिंदी किंवा इंग्रजी भाषेत संवाद साधतात, असा विनोदी किस्सा घडणार नाही!

तेव्हा, मराठी भाषेच्या भविष्याच्या चिंतेत वेळ न दवडता, या वाणीतील गोडवा पुढच्या पिढीला देण्याचा मनोमनी निश्चय करु. ज्यासाठी, मराठी साहित्यातील अनेक कंगोरे नव्याने अभ्यासून, व्यासंगातून वाङ्मयाच्या अधिक जवळ जाऊन मनोमनी जपलेल्या मराठी भाषेच्या अभिमानास पूर्णत्व देऊ!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares