digital upwas (1)

केलायत कधी डिजीटल उपवास…?

उपवासाशी कुठल्या ना कुठल्या कारणापोटी प्रत्येकाची ओळख होते, ती लहानपणीच! त्यात श्रद्धेपोटी कडक निर्जल उपवास धरणारे असतात, तर काही फराळाच्या आवडीखातर उपवास करणारे आणि हल्ली पोटाला नुसता आराम मिळावा या उद्देशाने उपवासाला आपलसं म्हणणा-यांत आस्तिक नास्तिक सगळ्यांचीच सरमिसळ असते. मनात पक्क बसलंय कि बारीक दिसण्यासाठी करावं लागतं डाएट आणि उपवास हे डाएट करण्याची आयतीच संधी देतं. तेव्हा, दिवसभर काही न खाता राहून दाखवण्यात पण एक ऐट वाटते. तर मग, कारण काहीही असो उपवास ही संकल्पना मूळात आरोग्याच्या काळजीतूनच उपजल्याचं म्हटलं जातं. पोटाला विश्रांती देण्याच्या या सुपरहिट कल्पनेत आज आपण थोडा बदल करणार आहोत.

उपाशी राहून पचनक्रियेला सुट्टी तर दिली, तशीच सुट्टी आपल्या मेंदूला, कानांना, डोळ्यांनाही द्यायला हवी ना? टेक्नोलॉजीचा भडीमार झाला आणि या बिचा-यांच्या नशीबी ओव्हर टाईम आला. सतत, नजरेसमोर टीव्ही, कॉम्प्यूटर, लॅपटॉप, टॅब, मोबाईल यापैकी कुठल्यातरी वस्तू असतातच. त्यात ऑफिसचे काम म्हणजे डोळे सतत कॉम्प्यूटरच्या स्क्रीनवर खिळलेले. बाकी फावल्या वेळेत, प्रवासात, अगदी रात्री झोप अनावर झाल्यानं तोंडावर मोबाईल आदळला की आपण तो बाजूला ठेवतो.

दारु, सिगरेट किंवा अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांसाठी व्यसनमुक्ती केंद्र असतात. तशी टेक्नोलॉजीच्या विळख्यात अडकलेल्यांना मानसोपचारतन्ज्ञ मदत करतात. अशा तन्ज्ञांची मदत घ्यावी लागेल, जेव्हा आपल्या या सवयींचा अतिरेक झालेला असेल आणि तो होऊ लागलाय हे आपण बिनदिक्कत मान्य करायला हवं. म्हणून वेळीच डिजीटल उपवासाचा मार्ग आजमावून पाहूया. आपल्या सवयींना लक्षात घेता, तसा हा उपवासाचा प्रकार सुरुवातीला कठीण वाटेल. यासाठी प्रथम सुट्टीचा दिवस निवडायचाय, त्या दिवसात कमीतकमी टेक्नॉलॉजी वापरण्याचा व मुख्यत्वे मोबाईल बिलकूल न वापरण्याचा संकल्प करायचाय. स्वत:वरील नियंत्रणाची इथे कसब लागणार आहे. फोन नाही, मेसेज नाही, इंटरनेट तर नाहीच नाही. अगदी फारच महत्त्वाचा फोन आल्यास उचलावा, पण पुन्हा उपवास एकनिष्ठेने पूर्ण करावा.

या उपवासाचे फळही ताबडतोब मिळते. ते म्हणजे कामं आटोपल्यावर भरपूर रिकामा वेळ हाती उरतो. ज्या वेळात स्वत:कडे लक्ष देता येईल. स्वत:चे छंद जोपासता येतील आणि लक्षात येईल, की कमी झालाय तो परस्परांमधला प्रत्यक्ष संवाद, सहवास आणि यांची उणीव भासत नाहीय हे अधिक घातक आहे. तेव्हा, वेळीच सावरुया. दिवसभर उपाशी राहण्याची तयारी असणा-यांना आणि नसणा-यांनाही, हा एक उपवास धरायचाय स्वत:साठी, स्वत:च्या माणसांसाठी! मनाला जघडलेल्या टेक्नोलॉजीच्या राक्षसास नामोहरण करणारा डिजीटल उपवास, सखी तू करणार ना?

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares