गगनी सजली संस्कृतीची ‘गुढी’!!

गगनी सजली संस्कृतीची ‘गुढी’!!

राजऋतू वसंताच्या आगमनाचा, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच मराठी नववर्षाचा पहिला दिवस, साडेतीन मुहूर्तापैकी एक, कुठल्याही शुभकार्यास प्रारंभ देणारा, असा विविध अंगांनी महत्त्वपूर्ण ठरलेला ‘गुढीपाडवा’ या सणाला जितके पौराणिक महत्त्व आहे तितकेच नैसर्गिक व वैज्ञानिक दृष्टिकोनही परिपूर्ण आहेत. आकाशाच्या दिशेने उभारली जाणारी गुढी स्वप्ने गगनाइतकी विस्तीर्ण असण्याचा संदेश देणारी दिसते, तर सोबत जरतारी वस्त्र, कडुनिंब व साखरेच्या माळ, त्यावर तांब्याचा उपडा गडू ठेवत सजलेली गुढी मानवाच्या मुलभूत गरजांना जपण्याची ग्वाही देते.
साहस, मांगल्य, नवचैतन्याचे प्रतीक असणारी श्रीरामाच्या विजयाची, शालिलवहन शकाच्या प्रारंभाची गुढी या पौराणिक कथांच्या पार्श्वभूमीसोबत वसंत ऋतूला सुरुवात करुन देणारी असल्याने ही गुढी पर्यावरण रक्षणाचे आवाहन देखील करते. रांगोळीच्या सडा घालून घराच्या अंगणात उभारली जाणारी गुढी हळूहळू फ्लॅटच्या खिडकीत डोकावू लागली व आता, कुठेही सहज ठेवता येईल अशी बोनसाय गुढी आली. वाढती लोकसंख्या व जागेची कमतरता यामुळे गुढी उभारण्यावर काढलेला बोनसाय गुढीच्या पर्यायाला पसंती मिळणे साहाजिक आहे. गुढीची उंची कमी झाली असली, तरी सणाचे महत्त्व कमी झालेले नसून या शुभमुहूर्तावर मनोभावे गुढीची पूजा केली जाते. बदलत्या परिस्थितीतून मार्ग काढत परंपरा जपण्याचा अट्टहास व गुढीपाडवा या सणावरील श्रद्धा दिसून येते.
हे सण व्यक्तिंमधील एकोपा जपण्याचे कार्य करीत असून, यामुळे वाढत्या यांत्रिक जीवनातून थोडी विश्रांती घेत प्रत्येकाला संस्कृतीविषयीचा आदर व्यक्त करण्याची संधी मिळते. द्वेष किंवा मतभेदांना बाजूला सारत येत्या गुढीपाडव्याला आपल्या नात्यांना वेळ देउया. गोडाच्या पदार्थांची चव घेत, गप्पा गोष्टींच्या आनंदाने सजलेली जिव्हाळ्याच्या भक्कम पायावर प्रेमाची गुढी उभारुया!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares