PARENTHOOD (1)

चांगले मार्क्स मिळवलेस, तर देईन!

‘मार्कांच्या बदल्यात पालकांकडून मुलांना दिल्या जाणा-या भेटवस्तूंचा खर्च शिक्षणाच्या खर्चात मोजावा!’ पालकांना हे विधान बिलकूल पटायचे नाही. शेवटी आई बाबा मुलांवरील प्रेमापोटीच त्यांच्या सा-या मागण्या पु-या करतात. भरपूर मार्क्स मिळवल्याचे, पुरेपूर बक्षिस मुले आपल्या पालकांकडून वसूल करतात. हा घेण्यादेण्याचा गंमतीशीर सौदा हौशेन पार पडतो. लाडाखोडात वाढलेल्या मुलांचे हट्ट पुरवताना आईवडील ना खर्चाचा विचार करतात ना मुलांमध्ये मुरत जाणा-या हट्टी स्वभावाचा. मार्कांच्या बदल्यात वस्तू, वस्तूच्या बदल्यात मार्क असे मुला पालकांतील लेनदेनचा व्यवहार हल्ली चांगलाच महाग झालायं. पालक मोठ्ठाल्या टक्क्यांची अपेक्षा करतात, तर मुलंही महागड्या वस्तूंची मागणी करतात.

मार्कांचे गांभिर्य समजून परिक्षेची तयारी करणा-या मुलांचा अपवाद वगळला, तर बरीचशी “चांगले मार्क मिळाल्यावर काय देणार बोला?” या बोलीवरच अभ्यासाला बसतात. ते लहानशा चॉकलेटवर खूष होत नाहीत. त्यांच्या यादीत मोबाईल, टॅब, लॅपटॉप, गेअरच्या सायकली, स्कूटी किंवा मग एखादी फॉरेन ट्रिप असते व या मागण्या पालकांच्या बजेट बाहेर असतील, तर झालं मनोजोगता परतावा मिळणार नाही, म्हणून अभ्यासातही मन लागत नाही. एकवेळ दंगेखोर मुलं परवडतील, पण अशा मागणीखोर मुलांना कसा आवर घालायचा?

पालकांनी फार सक्तीने वागावं, बक्षिसं किंवा उगाच महागडी कबूली देऊ नये, असे उपाय अजिबात सुचवणार नाही. खरेतर, भेटवस्तू द्याव्यात, त्यांच्या मेहनतीचे इनाम म्हणून शाब्बासकीला आठवणदाखल वस्तूची जोड असावीच. मात्र, त्या बक्षिसाचं स्वरुप काय असेल, यावर पालकांनी जाणीवपूर्वक विचार करावा. ‘धरला हट्ट, केला पूर्ण’ असे न करता पुढील आकर्षक पर्याय त्यांना बक्षिस स्वरुपात देता येतील.

  • त्यांना त्यांच्या आवडत्या खेळाचे किंवा कलेचे साग्रसंगीत शिक्षण घेता येईल. अशा कार्यशाळेत त्यांना प्रवेश मिळवून द्यावा किंवा फक्त भरपूर खेळता यावे या उद्देशाने स्पोर्ट क्लबची मेंबरशीप घेऊन द्यावी. स्विमिंग, टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, कॅरम, चेस असे कित्येक खेळ मुलांच्या आवडीनुसार निवडता येतील.
  • सोयीनुसार फॅमिली ट्रिप काढावी. नवे ठिकाण, शहर किंवा देश पाहाणे व्यक्तिमत्त्व चहुबाजूंनी खुलविण्यासाठी आवश्यक ठरते. ‘केल्याने देशाटन, मनुजा येत असे शहाणपण’, ही उक्ती खरी असली, तरी मुलांच्या हट्टापुढे नमतं न घेता खिशाला परवडेल असेच ठिकाण सहलीसाठी निवडावे.
  • मे महिन्यात वयोगटानुसार विविध समर कॅम्प्सचे आयोजन केले जाते. निकाल लागण्याआधीच मन लावून अभ्यास केल्याचे बक्षिस म्हणून अशा कॅम्प्सना मुलांना पाठवता येईल.
  • इलेक्ट्रॉनिक वस्तू मुलांना भेट म्हणून देणे चुकीचे नाही. फक्त गरज जाणून वस्तू निवडायला हवी. जसे, लॅपटॉप महाग असला, तरी शाळेच्या प्रोजेक्टवर्कमध्ये मदत करतो. पण, मोबाईल, एम.पी.थ्री प्लेअर, टॅब अशा वस्तू खरेच आवश्यक आहेत?
  • मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी बालवाचनालयाची मेंबरशिप किंवा छान पुस्तकांचा सेट भेट म्हणून देता येईल.

चांगल्या मार्कांचा मुलांनाच फायदा, योग्य कॉलेज, उत्तम पगाराची नोकरी, आर्थिक सुबत्ता असे त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांच्याच पदरी पडणार. पण तरी, कौतुकापोटी लाडाखोडात वाढलेल्या मुलामुलींचे हट्ट पुरविले जातात. अगदी इयत्ता पहिलीपासून पुढील कित्येक वर्षे पावलोपावली मुलांच्या यशाचे कौतुक केले जाते. त्यांच्या मागण्या पुरविल्या जातात. ज्यात काही वावगे नाही. मुलांनी हट्ट करावा, पालकांनी तो पुरवावा.

More Articles
Designed and Developed by SocioSquares