HealthyFOOD (1)

छोट्यांना पौष्टिक खाण्याची सवय लावणा-या ‘५’ युक्त्या!

लहान मुलांचा आवडता खाऊ म्हणजे, चॉकलेट, बिस्किटं, वेफर्स, चिवडा, चीझ, पिझ्झा, बर्गस, चायनीज किंवा हॉटेलमध्ये मिळणा-या अनेक चमचमीत पदार्थांपलिकडे “मला पालेभाजी आवडते”, “मला कारेल आवडतं”, “दूध आवडतं” असं सांगणारी मुलं शोधूनही सापडायची नाहीत. आणि आपण तरी मुलांकडून अशा उत्तरांची अपेक्षा का ठेवा? चमचमीत चवींचा अभाव असणारे जेवण कित्येकदा मोठ्यांनाही नकोसे वाटते. लहान मुले तर हट्टालाच पेटतात. पालेभाज्या, फळभाज्या नियमितपणे खायला तयारच होत नाहीत. मग, जेवणावर बसल्यावर रडारडीला होते सुरुवात!

मैत्रिणींनो, तुम्हाला या पेचातून सुटायचं असेल आणि तुमच्या बाळाला पूर्णान्न घेण्याची सवय लावायची असेल. तर पुढील कानगोष्टी लक्षात ठेवा बरं…

तुमच्या लहानग्यांनाही किचनमध्ये वावरु द्या-

गॅस, सुरी किंवा किचनमधल्या इलेक्ट्रॉनिक यंत्रांपासून लहान मुलांना दूर ठेवण्यासाठी त्यांना किचनमध्ये येऊ न देणे योग्य असले  पीठ मळणे, भाजी निवडणे गरम तेलातूपाशी संबंध नसणारी साधी कामे करताना घरातील छोट्यांनाही त्यामध्ये सहभागी करुन घ्या. अशाने पदार्थ बनवण्यासाठी लागणारी मेहनत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. वाढलेल्या पदार्थाला “नको” म्हणणे सोप्पे असते, कारण तो पदार्थ बनवण्या मागची अवघड प्रक्रिया ब-याचदा ठाऊक नसते.

त्यांच्यासाठी वेगळे अन्न शिजवू नका-

“बरं बाळा तुझ्यासाठी दुसरं काहितरी बनवते.” म्हणणा-यांपैकी तुम्हीही आहात का? तर मग, तुमची ही सवय ताबडतोब बंद करा. घरात जे अन्न सगळ्यांसाठी शिजलंय, तेच लहान मुलांसाठीही! तयार पदार्थांपैकी काही खाण्यास ते तयार नसतील, तर एकदा दोनदा त्यांच्या आवडीचे बनवालही आणि यातूनच त्यांना “नको” म्हणण्याची सवय लागेल. कडकडून भूक लागली, की नकोसं वाटणारं जेवणही सहज पोटात जातं. तेव्हा थोडं धीरानं घ्या.

लाड करावेत, पण थोडे बेताने-

जे मागू ते लगेच देऊ करणारे, सर्व हट्ट हौशेने पुरविणारे आई बाबा; लाभलेली नशीबवान बच्चेकंपनी खाण्याच्या भारी त्रागा करताना दिसते. “चॉकलेट द्याल, तर आता मेथीची भाजी खाईन” अशा मागण्या केव्हातरी पुरवणे ठिक, पण ह्याच्या बदल्यात ते, त्याच्या बदल्यात हे कबुल करुन घेणे वाईट.

आकर्षकरित्या सर्व्ह करा-

छोटी मंडळी रंगांकडे लगेच आकर्षित होतात. पदार्थांमध्ये असेच भरपूर आकर्षक रंग असतात. त्यांचा छान वापर करायला हवा. वेगवेगळ्या रंगाची फळे, विविध आकारात कापून त्यांना खायला द्यावीत. पदार्थ सर्व्ह करताना गार्निश करावा. फळभाज्या हटक्या पद्धतीने कापून डिश सजवता येईल. जेणेकरुन लहानग्यांना आपसूकच समोर ठेवलेला पदार्थ खाण्यात उत्साह वाटेल.

ओरडण्यापेक्षा समजावणे बरे –

त्यांच्या खाण्याच्या हजार नख-यांना तोंड देता देता कधीतरी आईही थकते. कारण, मुलांना उपाशी ठेवून, तिलाही घास घेववत नाही. तिची चिडचिड होते, ती रागवते, त्यांना दटावून खायला सांगते. अशावेळी त्यांना ओरडून मारुन मुटकून जे साध्य होणार नाही, ते शांतपणे समजावण्याने होऊ शकते. आई मंडळींनी आपल्या रागावर थोडासा संयम ठेवून, मुलांना शांतपणे पदार्थातील पोषकतत्वांचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा. कठीण असले, तरी आवश्यक आहे.

मुलांना वाईट सवयी सहज लागतात, पण चांगल्या सवयी आईने लावाव्या लागतात. त्यासाठीचा हा सारा आईने आपल्या वागणुकीत बदल करण्याचा अट्टहास कसा वाटला? कळवा तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेन्टबॉक्समध्ये किंवा सांगा तुमचे मत मेसेजद्वारे,

More Articles
Designed and Developed by SocioSquares