Toothbrush (1)

टूथब्रशच्या स्वच्छतेसाठी इतके कराच!!

टूथब्रश विकत घेताना आपण तो सॉफ्ट, मिडिअम किंवा हार्ड यापैकी दातांना किंवा हिरड्यांना साजेसा असणारा निवडतो. सोबत त्याचा रंग किंवा आकारही आपण अगदी न्याहाळून घेतो आणि त्याहून महत्त्वाचं आपल्याला टूथब्रशही ब्रॅंडेडच लागतो. दातांच्या चमकदारपणाचा प्रश्न असल्याने इतकी काळजी आवश्यकच आहे, कारण दातांची शुभ्रता हीच मुळात सौंदर्याचा महत्त्वाचा भाग आहे.

निरोगी आरोग्यासाठी या शुभ्रतेसोबत तोंडाची जंतूमुक्त स्वच्छताही गरजेची आहे. म्हणून, ब्रश कितीही महागडा असला, तरी तो नियमित वापरानंतर अस्वच्छ होतोच. तेव्हा, पुढील पद्धतींचा वापर करुन तुमचा टूथब्रश पुन्हा नव्यासारखा करुन घ्या, या प्रक्रियेत अजिबात दिरंगाई करु नका!

१. एखाद्या वापरात नसलेल्या अशा लहानशा भांड्यात पाणी घेऊन ते गॅसवर उकळवत ठेवावे. त्यामध्ये ५ मिनिटे ब्रश बुडवून ठेवावा. नंतर, व्यवस्थित कोरडा करुन ठेवावा. (ब्रश स्वच्छ करण्याचे असे भांडे शक्यतो वेगळेच ठेवावे.) ब्रशच्या तळाशी जमलेली टूथपेस्ट स्वच्छ करण्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरते.

२. थोड्याशा पाण्यात हायड्रोजन पॅराक्सोईड घालून, त्यामध्ये रात्रभर ब्रश बुडवून ठेवावा. असे केल्याने, ब्रशवरील बॅक्टेरियाज नष्ट होण्यास मदत होते. यानंतर, पुन्हा उकळत्या पाण्यात ब्रश बुडवून ठेवावा, मगच पुन्हा वापरात घ्यावा.

३. टूथब्रशमध्ये ओलावा कायम राहील अशा ठिकाणी तो ठेवू नये. यामुळे, त्यामध्ये बॅक्टेरिया होण्याची शक्यता जास्त असते.

४. टूथब्रश होल्डर आठवड्यातून किमान एकदातरी स्वच्छ करावा.

५. घरातील टूथब्रश एकाच ठिकाणी एकत्र ठेवत असाल, तर ते एकमेकांना लागणार नाहीत याची काळजी घ्या. यामुळे, एका ब्रशवरील बॅक्टेरिया सहज दुस-या ब्रशला लागतात.

६. शक्यतो, चार ते पाच महिन्यानंतर टूथब्रश बदला. लहान मुलांच्या टूथब्रशच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यायला हवे, त्यांचे ब्रश आणखी कमी कालावधीत बदलले तर उत्तम!

दातांची साफसफाई चोख पाहाणा-या टूथब्रशची देखरेख करण्याच्या या पद्धती नियमित फॉलो करायला हव्यात. मग, टूथब्रश कुठलाही असला, तरी दात ख-या अर्थाने चमकदार दिसतील हे नक्की!

More Articles
Designed and Developed by SocioSquares