sad kid banner

तणावाखाली जगणारी लहान मुलं!

टेन्शन काय फक्त मोठेच घेतातं? बच्चे कंपनी पण आपल्या छोट्या मेंदूवर फार ताण देते. शाळा, प्रोजेक्ट्स, खेळ, स्पर्धांमधलं हरण्याजिंकण्याचं भय त्यांच्या मनात बसलेलं असतंच. मात्र त्यासोबत, समाजात घडणा-या अनेक भयावह घटनाही त्यांच्या इवल्याशा मनावर परिणाम करतात. सोशल मिडीआमुळे हल्ली हवं नको ते सारंच त्यांच्यापर्यंत सहज पोहोचतंय. यावर उपाय म्हणून, त्यांना मोबाईल, इंटरनेट, टिव्ही पाहाण्यापासून रोखाल की ताण घेतात म्हणून त्यांचं स्पर्धांमध्ये सहभागी होणं बंद कराल. सध्याच्या युगात यापैकी काहीच होणं शक्य नाही. वेगवान नवयुगात मुलांसोबत तुम्हालाही सामील व्हायचंय, फक्त त्यांचा हात घट्ट धरुन ठेवायचाय, तो सुटू द्यायचा नाही.

त्यासाठी, त्यांच्या वागणुकीचं निरिक्षण करायला हवं. आई वडिलांना आपल्या बाळाचं नखरेल वागणं अनोळखी नसतंच, ते बदललेलं क्षणात कळतं. तुम्ही जितक्या सहज मुलांचे मूड्स वाचता, तितक्याच सहज त्यामागील कारण जाणून घ्यायला हवीत.

त्यांच गप्पगप्प असणं, अभ्यासात लक्ष न लागणं, मित्रांमध्ये खेळायला न जाणं, घरातल्याघरात राहून एकलकोंडी होत चाललेली मुलं हळूहळू नैराश्याकडे झुकू लागतात. एखादा चित्रपट, मालिकांमधील अघटित प्रसंग पाहिल्यावर ती त्या प्रसंगाचा खोलवर विचार करतात किंवा रोजच्या घडोमोडी सांगणा-या बातम्या, जसे मुलं पळवणारी टोळी, चो-या, दरोडे, खून, आत्महत्त्या, मृत्यू अशा घटनांची वर्णनं ऐकून मुलं घाबरतात. ते स्वत:च्या जीवनाशी घटना जुळवून पाहतात. यामुळे, ती भित्री बनण्याचा धोका अधिक असतो. त्यांचं बदललेलं वागणं पाहून, त्यांना दटावून पुन्हा नेहमीच्या वळणावर आणण्याची चूक घडता कामा नये. त्यांना प्रथम विश्वासात घ्यायला हवं. यासाठी पालक मुलांमध्ये मनमोकळा संवाद घडत रहायला हवा.

प्रयत्न महत्त्वाचे:

परिक्षेक कमी मार्क मिळाले, तरी नाउमेद न होता. नव्याने प्रयत्नांची शिकस्त करावी. लहान मुलांना अपयश पचवून पुन्हा नव्या प्रयत्नांसाठी उभं करायचं असेल, तर प्रथम आई बांबांनी त्याच्या अपयशाचा बाऊ करु नये.

तू शूर आहेस:

टवाळ मुलं-मुली ब-याचदा शांत स्वभावाच्या मुलांशी हेखेखोर वागत, त्यांना आणखी भित्रं बनवतात. ते अनोळखी लोकांत वावरण्याचा आत्मविश्वास गमावून बसतात. असे होऊ नये म्हणून दंगेखोर मुलांशी तितक्याच चतुराईने वागणे जमायला हवे. शाळेतल्या उचापत्या तुम्हाला तेव्हाच कळतील, जेव्हा तुम्ही मुलांशी नियमित गप्पा माराल. त्यांना त्यांच्यातील ताकदीची जाणीव करुन द्याल.

लैंगिक शोषण:

दुर्देवाने काही लहान मुलांच्या वाट्यालाही लैंगिक शोषणाचे अनुभव येतात. ओरडा किंवा मार यापलिकडे लैंगिकतेबाबत होणा-या या अदृश्य शोषणाचा उलगडा त्यांना होत नाही. तितकी त्यांची बुद्धी विकसित झालेली नसते. य़ासाठी, आई वडीलांनी चित्राद्वारे किंवा टेक्नोलॉजीचा वापर करत योग्य अभ्यासपुर्वक वयानुरुप गरजेपुरते लैंगिक शिक्षण त्यांना देत रहावे. काम कठीण वाटले, तरी अत्यावश्यक आहे.

Looser नाही Winner:

तू आमच्यासाठी कायमच विजेता/विजेती असणार आहेत. लढण्याची जिद्द, पुन्हा लढा देण्याची इच्छा तुम्हीच आपल्या पाल्यात जागृत करु शकता. कारण, तुमच्या प्रेमळ शब्दांत तितकी ताकद आहे.

स्पर्धा तर आयुष्यभर सुरुच राहणार आहेत. महत्त्वाची आहे ती व्यक्ती. त्या व्यक्तिचा आनंद. कोवळ्या जीवाचे स्वच्छंदी जगणे, चिंतेच्या गर्तेत ओरबाडले जाऊ नये म्हणून जपायला हवी त्यांच्यातील निरागसता.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares