course (2)

तरुणींपासून गृहिणींपर्यंत करिअरचं ब्युटी क्षेत्र!

व्यक्तिला नखशिखांत सुंदर बनवण्याची जादू विविध सौंदर्य प्रसाधनांत, तसेच सलोन किंवा स्पामध्ये दिल्या जाणा-या तत्सम उपचारांमध्ये आहे. सगळ्या प्रकारची प्रसाधने बाजारात उपलब्ध आहेत. ती ऑनलाईनही सहज विकत घेता येतात. पण त्याचा बिनचूक वापर करणं प्रत्येकाला जमत नाही, त्वचेचा पोत, क्रिमचे हजारो प्रकार, त्यांची ओळख, उपचारांच्या पद्धती हा सगळा किचकट मामला प्रत्येकाने शिकून घेणं कठीण आहे, त्यापेक्षा पार्लरमध्ये जाणं सोयीचं ठरतं. कारण, सौंदर्य प्रसाधनं योग्यरित्या वापरणं ही एक कला आहे आणि ब्युटी क्षेत्रात करिअर करायचं तर ही कला आत्मसात करायला हवी.

ब्युटी कोर्स केल्यानंतर स्वत:चं घरगुती ब्युटी पार्लर, नाहीतर ब्युटी सलोन सुरु करण्याचा प्राथमिक पर्याय आहेच. मात्र हे क्षेत्र इथपर्यंतच स्तिमित नाही, तर दिवसागणिक यात आणखी नवनवे पर्याय खुले होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतायत.

तात्पुरता मेकअप, क्लिनिंग, फेशियल, मॅनिक्युअर सारख्या सुविधांसोबत ग्राहकांमध्ये मेकओव्हरची मागणी वाढतेय. यासाठी ब्युटी क्षेत्रात सल्लागाराची भूमिका बजावता येते. त्वचा, राहणीमान, हेअर स्टाईल या सगळ्याचा एकत्रीत विचार करुन ग्राहकाला ट्रेंडी स्टाईलचा अचूक सल्ला देता यायला हवा. यासाठी उमेदवाराने डिप्लोमा इन ब्युटी थेरपी किंवा ब्युटी टेकनिक्सचे रितसर प्रशिक्षण घ्यायला हवे.

आर्टस्ट्री मेकअप:
विवाहाप्रसंगी, विविध सोहळे किंवा इव्हेंट्सला, तसेच कलाक्षेत्रात भूमिकांनुसार मेकअप करणे आवश्यक असते. भूमिकेची गरज जाणून पात्राला शोभेलसा मेकअप करावा लागतो. यासाठी त्वचेचा पोत, रंग, स्टाईलिंगचे ज्ञान असायला हवे. यात प्रात्यक्षिक करत करत शिकता येते. जितका कामाचा काळ अधिक, तितका गाठीशी अनुभव अधिक जमा होतो.

शारीरिक तसेच मानसिक सौंदर्यांचा लोकं जाणीवपूर्वक विचार करु लागलीत, शारीरिक व्याधींवर उपचार म्हणून कुठल्याही ऍन्टिबायोटीक्सपेक्षा व्यायाम, मसाजसारख्या उपचारांना पसंती देऊ लागल्याने स्पा किंवा वेलनेस सेंटर्सची संख्याही वाढतेय.

सौंदर्य सेवा:
शरीराला मनाला ताजेतवाने करणा-या ब्युटी थेरपीजचे आंतर्बाह्य ज्ञान हवे. त्यातील विविध प्रकार प्रशिक्षणांतर्गत शिकून घेता येतात. यासाठी डिप्लोमा इन स्पा ऑपरेशन, स्पा योगा, स्पा मॅनेजमेंट, असे विविध शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. तसेच स्टोन थेरपी, अरोमाथेरपी, हायड्रोथेरपी यांचे स्वतंत्र्यपणे प्रशिक्षण देखील घेता येते.

अनेक जणी ब्युटी कोर्स करतात, मात्र पुढे रोजगारासाठी त्याचा वापर कसा करुन घ्यायचा हे ठाऊक नसल्याने हतबल होतात. अशा मैत्रिणींनी वरील पर्यायांचा जरुर विचार करावा. तसेच, स्वत:चं ब्युटीपार्लर सुरु करायची इच्छा असणा-यांना भांडवलाअभावी अडून रहावं लागतं असेल, तर घरापासून ब्युटीपार्लरची सुरुवात करुन हळूहळू भांडवल जमवण्यास सुरुवात करावी. नोकरी तसेच स्वयंरोजगाराच्या संधी देखील या क्षेत्रात आहेत.

काय मग, तयारीला लागताय ना? ब्युटी क्षेत्रातील करिअरच्या इतक्या पर्यायांपैकी तुमच्या पसंतीचा पर्याय निवडा, मनलावून त्यातील खाचखळगे शिकून घ्या आणि बना एक आत्मनिर्भर स्वयंसिद्धा!

More Articles
Designed and Developed by SocioSquares