new ideas and customs banner

‘परंपरा’ कधी मान्य, कधी अमान्य!

प्रत्येक पारंपारिक सण समारंभात गतिशील, कृतिशील आणि विचारशील सरणीतून काहीतरी नवीन नियम, निश्चय अथवा संकल्प करण्याचा पायंडा नव्याने रुजू लागलाय. जुने सोडून काही नवे आचरण्याचा अट्टाहास कधी सोयीस्कर असतो, तर कधी प्रॅक्टिकल, जुनाट विचारांवर पाणी सोडून किंवा त्यामध्ये हलकेसे बदल करत त्याला नवं रुपडं देण्याचा तुम्हीही कधी प्रयत्न केलाच असेल. असं बंड करताना मनात एक भिती असते. प्रचलित रुढी परंपरांना डावलले, तर कालबाह्य गणले जाऊ किंवा पाश्चात्य व प्रगत संस्कृतिच्या आहारी गेलो तर समाजबाह्य ठरु.

उदाहरणार्थ दस-याला रावणाच्या पुतळ्याचे दहन करणे, वटपौर्णिमेला वडाची पूजा करणे, हळदीकुंकू समारंभ, मंगळागौरीचा सोहळा, दिवाळीत नरकासूर राक्षसाचे प्रतिक मानले जाणारे चिरांटे फोड़णे अशा एक ना अनेक परंपरांना फाटे फुटले. कारण, विभक्त कुटुंबात, नोकरी व घर दोन्ही सांभाळताना कित्येक महिलांना रुढींचे पालन करणे शक्य होतेच असे नाही.

त्यात भरीस भर म्हणून जुन्या नव्या पिढीतील विचारांची दरी पूर्वापार चालत आलेली आहेच. जुन्या चालीरितींत नवीन पिढीच्या दृष्टीने जरी काही logic नसलं, तरी एक बाब बिनदिक्कत मान्य करायला हवी, ती म्हणजे आपले सणवार येतात तेच मुळात ऋतूला धरुन. हिवाळ्यात ऊर्जा देणारे संक्रातीचे तिळाचे लाडू, पुढे याच ऋतूस पूर्ण विराम देणारी होळी, चैत्रातील हळदीकुंकूवाला पन्हे व कैरीची डाळ करण्याची पद्धत, तर पुढे श्रावणातील अनंत सोहळ्यांची न संपणारी यादी आपल्यासमोर आहेच. अशा सणांनिमित्त केल्या जाणा-या पदार्थांचे शरीराला होणारे आरोग्यदायी फायदे ध्यानात घेतले. तर जुन्या नव्या पिढीला सुवर्णमध्य साधणं शक्य होईल.

धार्मिकतेपलीकडे दैनंदिन जीवनातील काही कृती करताना वयस्कर मंडळींचे टोकणे तुम्हीही अनुभवले असेल. जसं की, आता आपण वेळ मिळेल तेव्हा नखं कापायला घेतो, शक्यतो रात्रीच वेळ मिळतो. यावर “रात्रीची नखे कापू नये”, असं म्हटलं जातं. कदाचित पूर्वी घराघरात वीज नव्हती. काळोखात बोटाला इजा होऊ नये म्हणून रात्रीची नखं कापू नयेत, असं म्हटलं जात असावं. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात मांसाहार न करणे कारण हा एक पवित्र महिना आहे पण यामागच तथ्य अस आहे कि आषाढ़ महिन्यात धुवाधार पाऊस पडतो त्यामुळे सर्वत्र रोगराई पसरते आणि अशात जर मांसाहार केला तर आपण सुध्दा आजारी पडण्याची शक्यता असते म्हणून श्रावण महिन्यात कटाक्षाने सात्विक आहार करावा.

More Articles
Designed and Developed by SocioSquares