pregagent (1)

नोकरी व प्रवास, सुरुच गरोदरपणातही…

नवजीवाची चाहूल लागताच स्त्रीजीवन असंख्य शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जातं , सोबत प्रकर्षानं जाणवू लागलेल्या एका नव्या जबाबदारीसाठी ती स्वत:ला तयार करु लागते. ते नऊ महिने प्रत्यक्षरित्या तिचे व बाळाचे असे त्या दोघांचेच असतात. अगदी खाजगी. जरी, सभोवताली नवनवी नाती त्याच्या स्वागतासाठी सज्ज असली, तरी तो महिन्यांचा काळ ती गरोदर स्त्री ज्या प्रकारे व्यतीत करेल, त्यावर बाळाची निकोप वाढ अवलंबून असते. म्हणूनच, अशा स्त्रीचं मानसिक स्वास्थ्य जपणं गरजेचं असतं, नेमकी ह्याचीच कमतरता भासते नोकरी करणा-या महिलांच्या बाबतीत!

सरकारी तसेच खाजगी कंपन्यांत सहा महिन्यांची भरपगारी मातृत्व रजा मिळत असली, तरी बहुतांश जणींना तिस-या चौथ्या महिन्यापासूनच सुट्टी घेणे शक्य नसते. कामाची आवड असण्यापेक्षा, नोकरीची गरज वा आर्थिक अडचण असल्याने गरोदरपणातही अगदी आठव्या महिन्यापर्यंत नियमित ऑफिसला जाणा-या महिला आपण पाहतो.

कामाचे ठिकाण घरापासून जवळ असेल तर ठिक, रिक्षा वा कॅबने लगेच ऑफिसला पोहोचता येतं. पण ट्रेनचा प्रवास करावा लागत असेल, तर मात्र तब्येतीची थोडी जास्तीची काळजी घ्यायलाच हवी. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार परिपूर्ण आहार तर घ्यावाच, सोबत तज्ञांच्या मार्गदर्शनाने आरोग्यदायीसे योगा प्रकारही नियमित करावेत. मन:शांती टिकून राहील व रोजचे ऑफिसमधील काम व तिथपर्यंतचा प्रवास केल्यानंतरही शारीरिक ऊर्जेची कमतरता जाणवणार नाही. आणखी एक महत्त्वाची बाब निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असते, ते म्हणजे दररोज पुरेसं चालणं! ऑफीसमधील दुपारच्या जेवणानंतर थोडंतरी चालावं, कंटाळा करु नये किंवा कामाच्या गडबडीत विसरुनही जाऊ नये.

काही ऑफीसेसमध्ये ठराविक प्रकारचे कपडे घालणं बंधनकारक असतं, असे कपडे अंगाला घट्ट बसणारे असतील, तर वरिष्ठांशी बोलून गरोदरपणात जरा मोकळ ठाकळं घालण्याची मुभा घ्यावी. जेणेकरुन दिवसभर घट्ट कपड्यांत वावरल्याने शरीराला त्रास होणार नाही.

गरोदरपणात घरचे डोहाळे पुरवतात, तशी ऑफीसमधील मंडळीही तुमच्या सोयीची खात्री बाळगतील. फक्त वेळोवेळी तुम्ही स्वत:हून तुमच्या गरजा त्यांच्यासमोर मांडायला हव्यात. जसं की, दिवसातील जास्तीतजास्त तास ज्या खुर्चीवर घालवायचे आहेत, ती खुर्ची आरामदायी असायलाच हवी ना! ज्यामुळे, पाठ वा कमरेवर ताण येणार नाही. तसेच, पायाजवळ लहानसे टेबल असावे. जेणेकरुन वाढत्या वजनाचा ताण थेट कमरेवर वा पोट-यांवर पडणार नाही.

अंतिम पण फार महत्त्वाचे, ती म्हणजे ऑफिसची व कामाची वेळ पाळणे. इतर दिवशी धापवळत ट्रेन, बसाच्या वेळा सांभाळत कामावर पोहोचण्यात तुम्ही पटाईत असालही, पण  गरोदर अवस्थेत अशी कसरत करणे धोकादायक असू शकते. म्हणूनच, कामावर पोहोचण्याची वा निघण्याची वेळ सोयीस्कर असावी. गर्दीची वेळ शक्यतो टाळावी. बाकी, ऑफीस म्हटलं की काम आलंच. कामाचा पसारा आटोपता राहील याचेही भान ठेवायला हवे. कारण, पुढचे काही महिने प्रत्येक सकाळ समान असेलच  असे नाही. कधी फार उत्साही असाल, तर कधी अचानक फार थकवा जाणवेल वा कुठलीही निराळी समस्या उद्भवू शकते. यावर उपाय म्हणून, ऊर्जा टिकून आहे तोवर कामे भरभर आटपून घ्यावीत आणि मोकळे व्हावे. डेडलाईन्स, टार्गेट्सची नंतर चिंता नको, म्हणजे अस्थिर स्वास्थ्याचा बाळालाही त्रास होणार नाही.

गरोदरपणातही नोकरी करत राहण्याचा निर्णय घेणारी, ‘ती’ बाळाच्या काळजीस पावलोपावली प्राधान्य देते यात शंकाच नाही. कारण, हे आईपण प्रत्येकीत अंगभूत असतं, फक्त मातृत्त्वाची चाहूल लागताच ते नव्यानं उभारी घेतं आणि आजच्या स्वावलंबी आईस नोकरी करत उदरातील तान्ह्याची काळजी घेण्याचं बळही देतं.

 

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares