Foot care monsoon (1)

पावसाळ्यात पायांना जास्त जपावे, असे….

दमट वातावरण, हवेतील ओलसरपणा त्यात पावसामुळे पाण्याशी येणारा सततचा संबंध, या सा-यामुळे शारीरिक स्वास्थ्य आंतर्बाह्य बिघडते. रेनकोट किंवा छत्री कोरडे राहण्यास मदत करीत असली, तरी पाय सारखे भिजतात आणि जास्तीतजास्त काळ ओले देखील राहतात. यासाठी, तब्येतीची काळजी घेताना पायांकडे मुख्यत: लक्ष द्यायला हवे. मातीचे कण नखांमध्ये रुतून बसतात, तर दूषित पाण्यामुळे पायाला खाज येते. पायावरील जखमांना कारणीभूत ठरणारे चिखलातील जीवजंतू व माश्यांपासून स्वत:चा बचाव करायचा, तर चार महिने घरात बसून रहाणे अशक्य आहे. म्हणून. पावसाचा आनंद घेण्यातही काही कमी ठेवायची नाही, हवे तितके मनसोक्त भिजावे आणि नंतर पायाची पुढीलप्रमाणे काळजीही घ्यावी.

  1. पावसाळी सॅण्डल्स फार घट्ट किंवा कडक असू नयेत, यामुळे पायाची बोटे अधिक आखडली जातात.
  2. बंद प्रकारतले किंवा पावलाखाली, बोटांजवळ पाणी साचवून ठेवणारे सॅण्डल्स वापरु नयेत, यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. प्रवासात किंवा ऑफिसमध्ये संधी मिळताच सॅण्डल्स थोडावेळ काढून ठेवावेत. पावलांना कोरडे होऊ द्यावे.
  3. पायांशी बोटांशी सतत पाण्याचा संपर्क आल्याने, बोटांच्या बेचक्यांमधील त्वचा पांढरी होते. तिथे चिखल्या होण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून, त्वचा कोरडी करुन तिथे अॅंटी फंगल पावडर लावावी.
  4. पाण्यामुळे तळपायाची फाटलेली त्वचा कातरेने कापण्याचे धाडस करु नये. यामुळे, इजा होऊन जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते.
  5. यासाठी, झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात १० मिनिटे पाय बुडवून ठेवावेत. पायांना आराम मिळेल. अशाने, भेगांमध्ये, नखांमध्ये अडकलेली माती निघून जाईल. पाण्यात ऍन्टिसेप्टिक लिक्विडचे काही ड्रॉप्सही टाकू शकता.
  6. पावसाळा त्वचेला मॉइच्छराईज्ड ठेवत नाही, तर त्वचेतील ओलसरपणामुळे संसर्ग होण्याच्या शक्यता वाढवते. म्हणून पाय गरम पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर, पुसून कोरडे करावेत आणि त्यावर मॉइच्छराईजर लावून मसाज करावा.
  7. खोबरेल तेल थोडे कोमट करुन भेगांवर हळूहळू चोळावे व थोड्यावेळाने कोरड्या कापडाने टाचा तळवा स्वच्छ पुसून घ्यावा. यामुळे, भेगांचे दुखणे कमी होऊन त्वचेचा कोरडेपणा निघून जाण्यास मदत होते.
  8. साय व साखरेच्या मिश्रणाने भेगांवर मसाज केल्याने भेगा कमी होण्यास मदत होते.
  9. पारदर्शक किंवा कुठल्याही रंगाचे नेलपॉलिश लावल्यास नखांच्या कडेला माती साचून ती दुखत नाहीत.
  10. तसेच, पावसाळ्यात पेडिक्युअर करणेही फायदेशीर ठरते. त्वचा व्यवस्थित स्वच्छ केल्याने फंगस इन्फेक्शन होण्याचा धोका टळतो.

पायांची अशी काळजी महिलांनी खरंतर वर्षभर घ्यायला हवी. कारण, घरकामे करताना पाण्याशी येणारा संपर्क टाळणे केवळ अशक्य असते. धुण्याभांड्यांच्या साबणाची एलर्जी होऊन त्वचेवर पुरळ उठते, तिला छिद्रे पडतात. नखे खराब होऊन पिवळसर रंगाची होतात, ती वळतात. असा त-हेच्या समस्या टाळण्यासाठी पायांची काळजी नियमित घ्यावी लागेल. जाणूनबुजून थोडा वेळ स्वत:साठी राखीव ठेवण्यावर प्रत्येक मैत्रिणीने भर द्यावा. काय मग, कंटाळा किंवा टाळाटाळ न करता इतके कराल ना?

More Articles
Designed and Developed by SocioSquares