Meditation (1)

प्रत्येकीने मेडिटेशन करावे, कारण…

वर्षानुवर्षे तपश्चर्या करणा-या ऋषीमुनींच्या गोष्टी तुम्ही वाचल्याच असतील. एका जागी स्थिर बसून, शांत चित्ताने मन एकाग्र करणे सामान्यांसाठी महाकठीण. जरा डोळे बंद केले, की मनात विचारांचे वादळ उठते. दिवसभर ऑफीसचं काम, आर्थिक गणितं, मुलांचा अभ्यास, घरकामाच्या ताणातून मनाला व मेंदूला जराशी विश्रांती द्यायला हवी ना? येणा-या दिवसाचे हसतमुख स्वागत करण्याआधी आदल्या दिवसाला चिंतामुक्त विराम देण्यासाठी प्रत्येकीने मेडिटेशन करावे.

मेडिटेशन कसे करावे?

घरातील एखादी शांत खोली निवडावी. मोबाईल, लॅपटॉप अशा यंत्रांना स्वत:पासून थोडे दूर ठेवावे. मांडी घालून बसावे. पाठीचा कणा ताठ असावा. डोक्यात कुठलेही विचार न आणता डोळे बंद करुन मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करावे. खोलीत सुंगधीत धूप किंवा उदबत्ती लावू शकता. तसेच, संगीताची नुसती धून ऐकत मेडिटेशन करु शकता.

मेडिटेशनसाठी शक्यतो सकाळची वेळ राखून ठेवावी आणि ही वेळ शक्य नसल्यास संध्याकाळी किंवा झोपण्यापूर्वी मेडिटेशन केले तरी चालेल. सुरुवातीला दोन मिनिटे स्थिर बसणेही कठीण जाईल. पण, सततच्या सरावानंतर मनात येणा-या विचारांना रोखून मन एकाग्र करणे जमू लागेल. हळूहळू वेळ वाठवत न्यावी. पाच मिनिटे, दहा मिनिटे, पंधरा मिनिटे आपल्या सोयीनुसार वेळेची मर्यादा निश्चित करावी.

मेडिटेशनमुळे होणारे फायदे?

बिघडलेले मनाचे स्वास्थ्य ब-याचशा आजारांना आमंत्रण देते. शरीर निरोगी असले, तरी मानसिक नैराश्य दुबळे बनवते. म्हणून आरोग्यास आंतर्बाह्य तंदुरुस्त करण्यासाठी मेडिटेशन आवश्य करावे. यामुळे, पुढील फायदे अनुभवू शकाल.

  1. मानसिक तणावाशी संबंधिक तक्रारी कमी होतात.
  2. रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  3. रक्ताभिसरण सुधारते.
  4. निद्रानाशाच्या समस्येपासून सुटका मिळते.
  5. रागीट किंवा चिडचिडा स्वभाव नियंत्रणात आणता येतो.
  6. स्मरणशक्ती वाढीस लागते.
  7. मनावर नियंत्रण मिळवल्याने, आत्मविश्वास वाढतो.
  8. विचार सकारात्मक बनू लागतात.

‘एकाजागी शांत बस’ असं लहान मुलांना नेहमी दटावलं जातं. पण, मेडिटेशन केल्यावर कळतं, की शांतचित्ताने एकाजागी बसणे सोप्पे नाही, पण तसे अवघडही नाही. घरातील चार भिंतींमध्ये स्वत:ची संवाद साधत मन:शांती मिळविण्याचा मेडिटेशनाचा कानमंत्र आपलासा करुन पाहाच!

More Articles
Designed and Developed by SocioSquares