talk (2)

मुलांशी करिअरविषयी बोलावे असे!

नवीन क्षेत्रे, लहान मोठे कोर्सेस, शिक्षणातील अनेक पर्याय यांमुळे हल्लीच्या विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहेत. मुलांना योग्य करिअरविषयी मार्गदर्शन करताना पुढील मुद्दे ध्यानात ठेवलेत, की तुम्ही मिळून ‘एक परफेक्ट करिअर’ निवडाल हे नक्की!!

मुलांचा कल –

मुलांशी करिअरबाबत बोलताना सर्वांत प्रथम ‘मुलांची आवड’ यावर विचार व्हायला हवा! आजही साक्षरतेची संख्या जास्त असणा-या शहरांमध्येच मुलांना त्यांची क्षेत्रे निवडू न देणारे पालक दिसून येतात. तर ग्रामीण भागात अपु-या सोयी सुविधा किंवा नव्या क्षेत्रांविषयीची अपूर्ण माहिती यामुळे नवी वाट निवडणे जोखमीचे वाटते. जे बहुतांश पालक आपल्या मुलांची आवड लक्षात घेतात. त्यांचे काम नुसत्या परवानगीवर थांबायला नको, तर त्यांनी निवडलेल्या नव्या पायवाटेची ओळख पालकांनीही करुन घ्यावी हवी. “आम्हाला त्यातलं काही कळत नाही..!”  असं न म्हणता त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती, येणारा खर्च, नोकरीच्या संधी, मुलांसोबत आई बाबांनाही माहिती हव्यात.

नव्या क्षेत्रांविषयी संशोधन –

नववी किंवा दहावीत असताच, शक्यतो विद्यार्थी करिअरचे काही पर्याय मनाशी ठरवतात. तर काहींची ही प्रक्रिया थोडी आरामात सुरु होते. कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्याची वेळ जवळ आली, की रिसर्च सुरु होतो. याशोध प्रक्रियेत जर आई बाबांनी उत्तम साथ दिली, तर मुलांना करिअर ठरवणे जास्त सोयीचे जाईल. त्यांच्या या परिस्थितीकडे नकारात्मकतेने न पाहाता, त्यांच्या आवडीचे विषय लक्षात घेऊन त्याच्यांपुढे करिअरचे विविध पर्याय खुले करुन द्यावेत. नव्या कोर्सेसची माहिती देणारी मासिके, लेख, व्याख्यानमाला यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.

ऑन ड्युटी २४ तास –

काही क्षेत्रांचे वर्णन ऐकल्यावर ती आकर्षक वाटतात. पगाराच्या मोठ्या आकड्याची भूल पडून ते क्षेत्र निवडले जाते. असे होऊ नये म्हणून त्या क्षेत्रातील विविध विभाग, पदासाठी आवश्यक असणारी डिग्री, नोकरीतील सुरुवातीच्या संधी, कामाच्या वेळा, त्यांची आंतर्बाह्य माहिती असणे आवश्यक आहे.

न दुखावणारा नकार –

काही वेळा मुलांपेक्षा पालकच अधिक गोंधळलेले दिसतात. आर्थिक किंवा इतर काही कारणांनी मुलांनी निवडलेल्या करिअरला परवानगी देणे शक्य नसते. अशावेळी, त्यांना नकारामागचे खरे कारण सांगावे, परिस्थितीची स्पष्ट जाणीव करुन द्यावी, त्याच क्षेत्रातील इतर पर्याय सुचवावेत. प्रेमाने साधलेला संवाद हेच यावरील औषध असून, मुलांना न दुखावता तुमच्या मनातील नकार त्यांच्यापर्यंत पोहोचवलात, तर या पेचातून सुखरूप सुटाल.

अशाप्रकारे, मुलांसोबत त्यांच्या करिअरविषयी मनमोकळे बोला. कुठलीही जनरेशन गॅप भरुन काढण्याची ताकद संवादात आहेच, त्यामुळे पालक व मुलांमधील हा संवाद तुमच्याही घरी अखंड सुरु राहूदे!

More Articles
Designed and Developed by SocioSquares