NEEDSPACE (2)

संसारात हवी थोडी ‘स्पेस’!

जुन्या नव्या पिढ्यांच्या विचारांत अन् वागण्यात प्रकर्षाने फरक जाणवतो. दोन पिढ्यांना लाभलेले भिन्न सामाजिक वातावरण व त्यानुसार घडलेली त्यांची मानसिकता त्यांच्या वर्तणुकीतून प्रतिबिंबित होते. विषय कुठलाही असो, भाषा, संस्कार, शिक्षण, कुटुंब, नाती, सगळ्यात प्रत्येक पिढीचे नवेपण मुरत जाते. ज्यातून, “आमच्यावेळी नव्हंत बाई असं!” म्हणणा-यांच्या कात्रीत तरुणाई कायम सापडते. सर्वात जास्त नजरेत भरते, ती नव्या जोडप्यांची संसारात सुरु असलेली स्पेसची शोधाशोध!

पूर्वीच्या काळी फक्त पत्रिकेचे गुण पाहून बोहल्यावर चढलेल्या कित्येकांची लग्ने टिकली, नांदली, एकत्र कुटुंबे सुखासुखी एकमेकाला धरुन राहिली. मात्र, हल्ली गुणांची जुळणी केली काय किंवा प्रेमविवाह करुन जोडीदाराला समजून घेण्यात वेळ दवडला काय, तरी लग्नानंतर मतभेद होऊन घटस्फोट घेणा-यांचे प्रमाण वाढतंच चाल्लंय आणि या घटस्फोटाचे कारण बहुतांशवेळा नात्याला ‘स्पेस न देणं’ हेचं असतं.

कुठून आली ही स्पेस संकल्पना? नवरा बायकोने परस्परांची आवड, छंद लक्षात घेऊन नातेवाईक, मित्रमंडळी, पार्ट्या, ऑफिस लाईफ एकमेकाला मनाजोकते जगू द्यावे. जोडीदारावर संशय घेणे, पाळत ठेवणे, सतत मोबाईल चेक करणे किंवा त्याने/तिने केव्हा, कुठे जावे किंवा जाऊ नये असे उगाचचे निर्बंध न लादता प्रत्येकाला आपापले निर्णय घेऊ द्यावेत. एकूणच काय जोडीदाराला मुठीत ठेवण्याचा आग्रह धरु नये, एकमेकाला स्वच्छंद जगू देणे म्हणजेच स्पेस!

सध्या संसाराची मुलभूत गरज बनलेली स्पेस लग्नाची साठी गाठलेल्या कित्येक वृद्ध जोडप्यांच्या गावीही नसेल. पण, नव्या पिढीला स्पेसची गरज भासतेय, ती कदाचित बदललेल्या जीवनशैलीमुळे! कामाचा अतिरिक्त ताण, बिघडत्या सवयी, जंग फूड, प्रदुषित वातावरण, वाढती महागाई, आर्थिक खर्च, बचतीचे हिशोब या सा-यामुळे सर्वतोपरी ढासळत चाललेले आरोग्य मनाचे संतुलनही बिघडवते. व्यस्त दिनक्रमात नात्याला द्यायला वेळच उरत नाही. संवाद न घडल्याने नात्यातील विश्वास कमी होऊन गैरसमज वाढतात. यातूनच नात्यावर बंधने लादली जातात. उगाच वादविवाद नकोत, म्हणून जोडीदाराशी मनमोकळं बोलण्यापेक्षा स्वत:ला वेळ देण्यात अधिक स्वारस्य वाटतं. जोडीदाराला वगळून एकट्यानेच प्लॅन्स करण्यात अधिक मौज वाटते. खोटं बोलणं आपसूकच येतं. यातून, पुन्हा खटके उडतात. हे असेच चालू ठेवायचे नसेल, तर नात्यांत आलेला यांत्रिकपणा कमी करुन, त्यात पुन्हा एकदा भावनांचा ओलावा निर्माण करण्यासाठी त्यावर संवाद हेच औषध. कारण, नाते जितके घट्ट धरुन ठेवू, तितके गुदमरते व जितके मोकळे सोडू तितके ते बहरते आणि यासाठी नात्याला मनमोकळ्या गप्पांचे खतपाणी नियमित द्यावे.

More Articles
Designed and Developed by SocioSquares