kids banner

सावध रहा : लहानग्यांचे फोटो अपलोड करताना!

जन्मल्या बाळाचा चेहरा नातेवाईकांना पूर्वी लगेचच पाहता यायचा नाही. आधीच संपर्काची साधने मर्यादित होती, त्यात मंडळीपर्यंत निरोप पोहोचायलाच वेळ लागयचा, नाहितर बाळाला नजर लागेल या भितीनं घरच्यांचा जीव घाबरा व्हायचा. पण हळुहळू संपर्काची साधन वाढली आणि विचारांतील भिती देखील गळून पडली. आता बाळ जन्मताच पहिला वहिला फोटो अशा हॅश टॅगखाली तो फोटो थेट सोशल मिडीआवर अपलोड होतो आणि तान्ह्या बाळाचे कलेकलेने वाढणे क्षणार्धात जगाच्या कानाकोप-यात पोहोचवण्याच्या निरंतर प्रवासास सुरुवात होते. यात अग्रणी असतात ते स्वत: आई वडील!

बाळ खाऊ लागलं, बोलू –

चालू लागलं, शाळेत जाऊ लागलं असं काहीही निमित्त असो, त्याची अपडेट देखणा फोटो व मस्त कॅप्शनसहित वेगवेगळ्या सोशल मिडिआवरील अकाऊन्ट्सवर अपलोड करताना फोटोजचं प्रमाण कमी असू द्या आणि फोटो अपलोड केलाच तर पुढील बाबी काळजीपूर्वक लक्षात ठेवा.

लोकेशन टॅगिंग-

फोटोबद्दल माहिती पुरवताना तो कुठल्या ठिकाणी काढलेला आहे हेही नमूद करता येतं. पण सतत असं लोकेशन सांगणं धोकादायक असू शकतं. यामुळे, तुमच्या पाल्याची शाळा, पाळणाघराचा पत्ता, तुमच्या घरचा पत्ता किंवा खेळायची ठिकाणं अनोळखी लोकांपर्यंत पोहोचतात.  नकळतपणे दैनंदिन जीवनाची त्यांना माहिती मिळते, तुमचं व तुमच्या पाल्याचं रोजचं वेळापत्रक समजतं. तुम्ही बहुतेकदा किती वाजता कुठे असता ह्याचा अंदाज बांधून ते त्यांचा विघटीत कार्यभाग साधू शकतात. हल्ली वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांत सोशल मिडीआचा आधार घेतलेली अनेक उदाहरणे आपण पाहतो.

आम्ही लाईक्स कमावतो –

लहान मुलं निरिक्षणातून शिकतात व तसतसा त्यांच्या व्यक्तिमत्त्वालाही आकार मिळत जातो. जसं की, फोटोजला २०० लाईक्स मिळावल्यावर तुम्ही खूष होत असाल, तर त्यांनाही असे लाईक्स, कमेन्ट्स कमवण्यातच अप्रुप वाटू लागेल. ज्यामुळे, शिक्षण, करिअरद्वारे ख-या जगण्यात मिळणा-या यशाहून सोशल साईट्सवरील आभासी यश त्यांना अधिक आवडेल. नंतर, मुल जाणतं झाल्यावर सतत फोन मागत असेल, तर  त्रागा करुन काय फायदा? यावर उपाय म्हणून वेळीच त्यांना सोशल मिडीआपासून दूर ठेवणं योग्य ठरेल.

कौटुंबिक सोहळे-

ग्रुप फोटोज अपलोड करतानाही थोडी खबरदारी घेणं गरजेचं असतं. ज्यांचासोबतचा फोटो अपलोड करतोय, त्यांची फोटो अपलोड करण्याआधी एकदा परवानगी घ्यावी. त्यांना टॅग करणं पसंत आहे, की नाही तेही जाणून घ्यावं. फोटोत लहान मुलं असल्यास, त्यांना क्रॉप करावं किंवा त्यांचा एखादाच फोटो अपलोड करावा.

वेगवेगळ्या सोशल माध्यमांतून आपल्या पाल्याचे फोटोज कौतुकाने पोस्ट करताना आपण फार मोठा धोका पत्करत आहोत. खरंतर, सर्वच वयोगटाने सोशल मिडीआ हाताळताना स्वसुरक्षेच्या दृष्टीने काही नियम पाळणे गरजचे आहे. फेक अकाऊन्ट्सद्वारे होणा-या आर्थिक किंवा भावनिक फसवणूकीला बळी पडायचं नसेल, तर प्रथम मोठ्यांनी सतर्क रहावं आणि लहानांनाही यापासून दूर ठेवावं. तरच, सायबर क्राईमच्या विळख्यापासून आपण स्वत:चे, आपल्या व्यक्तिंचे संरक्षण करु शकू.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares