Family (2)

सासरच्यांशी जुळवून घेताना….

चित्रपट, मालिकांमधून सासू, सूनेचं नातं वर्षानुवर्षांपासून इतकं नकारात्मक रंगवलं जातंय, की दहा पैकी एखाद्या मालिकेतून किंवा चित्रपटात या नात्याला सकारात्मकतेची किनार दाखवली जाते. खऱचं सासरकडच्या व्यक्तिंसोबत चांगले ऋणानुबंध बांधले जाणं अशक्य आहे. मनात पक्क बसलंय की सासू-सून, नणंद-भावजय या नात्यात वाद हमखास होतात. सासूने सूनेचा केलेला छळ, नंणदेने संसारात कालवलेले विष, हुंडा न दिल्याने बायकोला केलेली मारहाण, माहेरच्यांना दिलेल्या धमक्या एक ना अनेक प्रकारे सासर माहेर अशा वादातून उद्भवलेल्या कौटुंबिक हिंसेची उदाहरणे घडत असली, तरी आता साक्षरतेचा आकडाही वाढलाय. ग्रामीण तसेच शहरी भागातही अशा हिंसेचे प्रमाण आता फार कमी झालेय. हे नक्कीच स्वागतार्ह आहे.

मुलीही अन्यायाविरुद्ध लढा देण्यास सक्षम आहेत. कायद्यांविषयी जाणत्या झाल्यात. म्हणूनच, लग्नाआधीच सासरच्या व्यक्तिंविषयी मनात कटूता असण्यापेक्षा या नात्यांना किमान एक संधी तर देऊया. माध्यमांची विचारधारा बदलायची तेव्हा बदलेल, तोपर्यंत आपण आपल्या संसाराचा डेली-सोप का होऊ द्यावा? नुकतच लग्न झालेल्या किंवा लवकरच सौ होण्याच्या तयारीत असणा-या तरुणींसाठी आजचा हा लेख प्रपंच!

सासरची नाती छान जपता येईल, त्यातील गोडवा कायमस्वरुपी टिकूनही राहील, त्यासाठी प्रथम समोरुन स्मित यायला हवे. हा आग्रह सोडून आपणच थोडा पुढाकार घेऊया.

प्रथम आपण जशा आहोत, पहिल्या भेटीपासून वागणूक तशीच असायला हवी. त्यात कुठलाही बडेजाव किंवा दिखाऊपणा नको. कारण, धारण केलेला स्वभाव फार काळ टिकत नाही. तेव्हा लोकांना आपलंस करावं, ते वागणूकीतील खरेपणाच्या  जोरावर.

कुठलीच व्यक्ती आईची जागा घेऊ शकत नाही. मग, सासूला आई कसे म्हणावे? असा प्रश्न हल्लीच्या मुलींना पडतोय. अशावेळी, आपल्या आवडत्या व्यक्तिची आई म्हणून तिला प्रथम आपलं मानलं तर कदाचित कुठल्या नावाने हाक द्यावी हा प्रश्न सुटेल. मनासमोरुन परकेपणाचा पडदा दूर सारला, तर नाती अधिक स्पष्ट व आपली दिसतील.

सध्या सासू देखील मॉर्डन होऊ लागलीय. पंजाबी ड्रेस, जीन्स, टॉप असं काहीबाही घालायची तिची तयारी असते. त्यामुळे, फॅशनेबल सुनेला अशी नवी फॅशन आजमावण्याची आवड असणारी छान मैत्रीण सासूद्वारे मिळू शकते. प्रयत्न करायला काय हरकत आहे.

सासरे, नणंद, दीर, जाऊबाई अशा एक ना अनेक व्यक्तिंच्या तुमच्याशी जुळणा-या काही समान आवडीनिवडी हेरुन त्यावर गप्पा रंगवत संवाद वाढवता येईल.

तुमच्यानंतर घरात येणा-या नव्या पिढीसमोर चांगला आदर्श ठेवायचा असेल, तर एक बाब ध्यानात ठेवायला हवी.  ती म्हणजे, शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात, पण संस्कारांच तस नाही. मोठ्यांच्या वागण्यातून संस्कार आपसूकच लहानांनमध्ये झिरपतता. त्यामुळे, आई बाबांचे आजी आजोबांशी असणारे वागणे पाहून तेही त्याचे अनुकरण करतात.

एकदिवस आपणही आजीआजोबा होणार आहोत. हे ध्यानात घेऊन घरातील वरिष्ठांशी आदराचे वागणे ठवले; ब-याच गोष्टी सूकर होतील प्रत्येकाच्या नकळत!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares