sath-swatahla

साथ स्वतःला स्वतःची देऊया आपले स्थान आपण निर्माण करुया … !

नमस्कार मैत्रिणींनो! झी मराठी जागृतीच्या माध्यमातून नव्या विचारांचा, नव्या जाणिवांचा आणि अखंड ज्ञानाचा जागर महाराष्ट्रभर सुरु आहे आणि ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून मी त्याचा एक भाग आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. तुमच्याशी बोलायला, मनातल्या गोष्टी शेअर करायला हे वेबसाइटचं माध्यम मिळालं त्याबद्दल सर्वप्रथम मी झी मराठी जागृतीचे मनापासून आभार मानते. माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे लिखाणासाठी मला पुरेसा वेळ मिळत नव्हता पण जागृतीच्या या अभिनव उपक्रमाद्वारे मला आता पुन्हा लेखणीशी नातं बांधता येईल, याचा आनंद आहे. झी मराठी जागृतीच्या विविध कार्यक्रमांमधून आपली भेट होतच राहिल पण या माध्यमातून आणखी दिलखुलास बोलता येईल हे नक्की.

‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे’, ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’, ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो’, ‘स्त्री आणि पुरुष ही संसाररथाची दोन चाकं आहेत’, अशा तत्सम अनेक गोंडस वाक्यांचा कौतुकास्पद भडीमार आपल्या स्त्री वर्गावर मदर्स डे, वूमन्स डे अशाप्रसंगी होतच असतो. मला कधी कधी याचं खूप आश्चर्य वाटतं, एकीकडे स्त्रियांना अशा अलंकारिक शब्दांनी सजवणारा हा समाज दुसरीकडे त्याच स्त्रियांना तुच्छतेने कसा काय वागवू शकतो? मदर्स डेला आईसोबत सेल्फी काढून फक्त एका दिवसासाठी आपापल्या फेसबुक किंवा व्हॉट्स Appवर प्रोफाईल पिक ठेवणाऱ्या आपल्या संस्कारी समाजाचं खरंच हसू येतं. मान्य आहे, समाजाची मानसिकता बदलणं थोडं अवघड आहे. समाजपरिवर्तनाची पायरी चढण्याआधी आपल्यापैकी प्रत्येकीने अगोदर स्वतःला सिद्ध करणं खूप गरजेचं आहे. आपल्या प्रत्येकीमध्येच एक अनामिक शक्ती संचार करत असते आणि याची जाणीव आपल्यातल्या प्रत्येकीला असली पाहिजे. याचसंदर्भात काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे.

बऱ्याच महिलांकडून ऐकायला मिळते, की नोकरी आणि संसार ही तारेवरची कसरत करता करता, मनाला हवं तसं आयुष्य जगायला मिळत नाही. ठरवून दिलेल्या एका चौकटीतील असं जगणं मानसिक आणि शारीरिकरित्या वेदनादायी ठरतं. म्हणून अशा स्त्रियांना माझं नेहमी सांगणं असतं, आपलं करिअर, व्यवसाय किंवा नोकरी, कुटुंब या सगळ्यामध्ये वावरताना आपण आपल्याभोवती असलेल्या सगळ्या मर्यादांचे रिंगण मोडून स्वतःच्या मोकळ्या आणि स्वच्छंदी आकाशाचा शोध घेण्यासाठी सज्ज व्हायला पाहिजे. रोजची वाट चुकवून एखाद दिवस आडवाटेने जाण्यातही गंमत आहे. कदाचित हीच आडवाट तुम्हाला मनमोकळेपणाने जगण्याची दिशा दाखवेल, म्हणून प्रत्येकीने स्वतःचा शोध स्वतःच घ्यायला हवा. आज आपली प्रगती व्हावी म्हणून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून प्रयत्न होत आहेत त्याकडे डोळसपणे पाहून आपणही पुढाकार घ्यायला हवा. आयुष्य म्हणजे शाळा! इथे प्रत्येक दिवस बोर्डाच्या परीक्षेला बसल्यासारखा, तसाच तो रोज नवीन काहीतरी शिकण्याची संधी उपलब्ध करून देणारा, म्हणून कुठल्याही टप्प्यात ‘मला शिकायचंय,’मी अमुक एखादी गोष्ट नक्की करू शकते’ अशीच विचारधारणा असायलाच हवी. मैत्रिणींनो, बाबासाहेब आंबेडकरांनी देखील समाजाच्या विकासाचे आणि प्रगतीचे परिमाण आपल्या प्रगतीवर असल्याचे सुचित केले होते. I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved. या त्यांच्या विधानावरून आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे याची जाणीव होते.

खरं सांगू का, स्त्रियांना समाजात काय स्थान आहे यापेक्षा ते स्थान प्रस्थापित करण्यासाठी आपण काय करतो याकडे प्रत्येकीनेच एक जबाबदारी म्हणून पाहिले ना तर मला नाही वाटत स्त्रियांच्या स्थानाला कोणी धक्का लावु शकेल. नेहमी म्हटलं जातं की, नवीन वाटा धुंडाळल्या पाहिजेत ते अगदीच बरोबर आहे;पण त्यापुढे जाऊन नवीन वाट निर्माण करायचा प्रयत्न करायला देखील काही हरकत नाही. स्त्री शक्तीची चुणूक आज प्रत्येक क्षेत्रात दिसून येतेय त्याचा आपण अभिमानच बाळगला पाहिजे आणि त्यातून प्रेरणा घेऊन स्त्री शक्तीची जाणीव आणि जागृती आपल्या मनावर बिंबवायला पाहिजे. तेव्हा आपण जे काही करतोय त्यात अढळ स्थान निर्माण करण्यासाठी सर्वार्थाने सज्ज होता येईल. तुम्हालाही पटतंय ना ! मग आता तुम्ही देखील आता सज्ज व्हा आणि आपल्या इतर मैत्रिणींना देखील सज्ज करा एका नव्या सुरुवातीसाठी…

Designed and Developed by SocioSquares