party1

आम्हा मैत्रिणींची सहल…

जीवन जगण्याच्या दोन परस्पर भिन्न त-हा एकाच जन्मात अनुभवते ती स्त्री! व्यक्तिमत्त्वाचे महत्तम भाग असतात उपजत स्वभावगुण आणि ते बदलणं महाकठीण. शांत, रागीट, मनमिळाऊ, हेकेखोर अशा कुठल्याही प्रकारात मोडणारे वागणे असले, तरी आपण जसे आहोत तसेच्या तसे आपल्याला आपली माणसं स्विकारतात, पण थोडे वळण हवे म्हणत संस्कारात मोडणा-या सवयींचा कित्ता देखील बालपणापासून गिरवून घेतात. माहेरुन सासरी जायचे असल्याने ह्या धड्याचे अध्ययन मुलांपेक्षा मुलींना अधिक मन लावून करावे लागते. कारण, स्वच्छंदी, मनमौजी जगण्याची संधी माहेर देतं आणि संस्काराचं पाठ्यपुस्तक सासरचे दिवस सुखकर करतं.

आपण मुली आई बाबांनी घालून दिलेले नियम पाळतो, तर कधी सोयीस्कररित्या डावलतो. शाळा, कॉलेज, मित्रमंडळी त्यांच्यासोबतचे मनसोक्त फिरणे, घरी यायला उशीर झाला तरी आईचे सावरुन घेणे, घरगुती सोहळ्यांना जायचे की मैत्रिणींसोबत सिनेमाला हे आपले आपण ठरवून मोकळे होतो. हट्ट पुरविणारे बाबा, पुरेपूर लाडावून ठेवणारे आजी आजोबा. सहाजिकच हे सारं लग्नानंतर मागे पडतं.

नव्या नात्यांसोबत संसारातील जबाबदा-यांच्या न संपणा-या यादीचा हिशोब लावण्यात आणि मुलांना मोठं करण्याच्या नादात ‘ती’ जिथल्या तिथेच राहते. पूर्वीची मौज, मैत्रिणींच्या गोतावळ्यातले उत्साही दिवस या ना त्या कारणाने फक्त आठवत राहतात. टेक्नोलॉजीने संपर्कात राहणं शक्य आहे, मात्र दुर्मिळ झालयं ते प्रत्यक्ष भेटणं.

कधी भेटायचं ठरवलं, की एकदोघी सोडून सगळ्या मैत्रिणींचं एकच रडगाणं, “अगं वेळ नाही”, सकाळी जेवणाचे डबे, मुलांच्या शाळा, त्यांचा अभ्यास, सासूबाईंच्या औषधाच्या वेळा, कामवाली बाईचे खाडे, घरातली साफसफाई, पुन्हा रात्रीच्या जेवणाची तयारी, एक ना अनेक कारण प्रत्येकीकडे तयार असतात. मनातून मैत्रिणींना भेटायचं तर असतं, पण घरकामांना कात्री लावून घराबाहेर पडण्याचा धीर होत नाही. पुरुषमंडळीचे प्लॅन झटक्यात ठरतात, लगेच मार्गीही लागतात. अगदी सहलीसाठीही आज ठरवून उद्या निघणं, त्यांना शक्य आहे तर महिलांना का नाही…?

तुम्हा मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये हा विषय छेडून पाहात. घरकामांना डावलायचं मुळीच नाही. सगळे सोपस्कार व्यवस्थित पूर्ण करायचे आणि सहा महिन्यांतून एकदा लागून येणा-या दोन सुट्ट्या हेरुन छान वन डे ट्रिप काढायची. जबाबदा-या नेहमीच्याच आहेत, त्या पुढेही वर्षानुवर्ष पार पाडायच्यात. पण, म्हणून आजचा क्षण जगणे का सोडा? मैत्रिणी मैत्रिणी मिळून एक नाईट आऊट तर व्हायलाच हवी. त्याला ना वयाचं बंधनं, ना विचारांच. फक्त अशा सहलीवर जाताना सगळ्या मैत्रिणींनी एक अट पाळायची. कुठल्याही घरतल्या विषयांवर गप्पा न मारण्याची.

दिनक्रमात बदल म्हणून पिकनिकचा पर्याय निवडायचा, तर गप्पांमध्ये पुन्हा तेच तेच विषय कशाला हवेत. म्हणूनत, मैत्रिणी मैत्रिणी सहलीला गेल्यावर कामांचा व्याप, घरातील अडचणी, नात्यांच्या घोळक्याला जरा गप्पांमधून बाद करायचं. मनाला ताजेतवाने करणारी सहल कर हवीत, त्यात जर मैत्रिणींची सोबत असेल, तर ढिगभर आनंददायी क्षणत जमा होतील यात शंकाच नाही.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares