monsoon2019 (1)

पर्यावरदायी टापटीप टूर…!

खिडकीतून पाऊस न्याहाळण्याची मज्जा और असली, तरी पावसाचं पाणी अंगावर घेत चिंब होण्यातही निराळी धम्माल आहे. ती अनुभवण्यासाठी घराबाहेर पडलचं पाहिजे. मग कुणी लॉंग राईडवर जातं, तर कुणी थेट निसर्गरम्य ठिकाणं काठतं. पावसाळी ट्रेकर्स वा हायकर्सचा एक वेगळाच वर्ग आहे. जो डोंगर, द-या, गड, किल्ले, जंगलवाटांतून भटकंती करतोय. बॅगपॅकर्सचा जमाना आहे. आलं मनात, की भरली बॅग आणि निघालं भटकायला. वाटलं तर टेंट असतोच जवळ, मोकळ्या आभाळाखाली कॅपिंगचा आनंद घ्यायचा.

धकाधकीतून ब्रेक घेत, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. को-या अन् चकचकीत शहरांपेक्षा दगड मातीनं सजलेल्या रानवाटा तुडवत निघालं, की डोळ्यांना सुखवणारं दृश्य उंचावरून न्याहाळता येतं. हाच नयनरम्य निसर्ग, छान आठवणी, फोटोज् स्वत:सोबत घेऊन घरी परततो आणि तबदल्यात तिथे काही सोडून येतोय का?

प्लॅस्टिकच्या बाटल्या, डबे, कागदी प्लेट्स, खाऊ-बिस्किट-चॉकलेट्सचे रॅपर्स, झाडाझुडपांत अडकलेले दिसतात. कधी वा-याने  प्लॅस्टिकच्या पिशव्या उडून जातात. त्या झाडांच्या शेंड्यांवर झोकात फडकत असतात. कॅमेरात निसर्ग कॅप्चर करताना चतुराईनं अस्वच्छ परिसर टाळता येतो. पण, उघड्या डोळ्यांनी पर्यटन स्थळांच्या होणा-या हानीकडे कसे दुर्लक्ष करणार? आणि का करावं दुर्लक्ष?

घर स्वच्छ ठेवतो, तितक्याच आपुलकीनं पर्यावरण जपायला कितीसे कष्ट लागणार आहेत? यामध्ये पैसेही खर्च होत नाहीत. फक्त ढिसाळ सवयींना थोडी मुरड घालावी लागते. खाऊच्या पिशव्या, रॅपर्स, रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या असा फेकून द्यायचा कचरा, पुन्हा बॅगेमध्येच ठेवावा. पुन्हा रुम किंवा हॉटेलवर पोहोचल्यावर किंवा थेट घरी पोहोचून कचरा कचरापेटीतच टाकावा. जेणेकरुन त्याची योग्य विल्हेवाट लागेल.

प्रत्येक पर्यटकाने हा नियम काटेकोरपणे पाळला, तर निसर्गरम्य परिसर पुन:पुन्हा अस्वच्छ होणार नाही. ब-याचशा सेवाभावी संस्था, ट्रेकिंग ग्रुप डोंगर, किल्ले, समुद्रकिनारे स्वच्छ करतात. तरी, कित्येक टन कचरा काही दिवसांनी पुन्हा जमा होतो. काही हात अस्वच्छतेत मग्न, तर काही हात स्वच्छतेत गुंग. अविरत सुरु असलेलं हे चक्र थांबवायचं असेल, तर स्वयंम शिस्तीस पर्याय नाही. फिरायला गेल्यावर इतस्त: कचरा फेकताना किंवा कचरा फेकणा-याकडे दुर्लक्ष करताना, आपण काहीतरी गुन्हा करतोय, ही भावना प्रबळ व्हायला हवी. मनाला चुरचूरणं सहन न होणा-या दुखण्यात रुपांतरीत होईल, तेव्हा निसर्गाला निरोपयोगी वस्तू न देता परतण्याची ओढ लागेल.

काय पटतंय ना? तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा. अधिकाधिक वाचकांपर्यंत हा लेख पोहोचवा, त्यासाठी शेअर नक्की करा.

 

Popular Posts
Banner 02
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares