फिरुनी नवे जन्मेन मी

खरंच गाण्याच्या या ओळी गुणगुणल्या की नवीन उमेद मिळते. नव्या पिढीला जन्माला घालणाऱ्या आपल्यातल्या प्रत्येकीने आज स्वतःला म्हणायला हवे ‘फिरुनी नवे जन्मेन मी’. असं मी का म्हणतेय ठाऊक आहे? कारण घराच्या आतली स्त्री आणि घराबाहेर पडलेली स्त्री यामध्ये आज परिस्थितीत सुधारणा आहे म्हणा, स्वातंत्र्याचे  पंख देखील आहेत पण ते आपल्या आजुबाजूच्या, घरातल्यांच्या मानसिकतेत आहे का तर यावर प्रश्नचिन्हच आहे.

आपल्या मुलीने जोडीदाराची निवड तिच्या पसंतीने केली तर काळजी वाटणारच म्हणा! पण आपल्या मुलीची निवड चुकीचीच आहे असा ठाम समज करून तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याऐवजी, मनाचा मोठेपणा दाखवुन आपण आई म्हणून समर्थ साथ द्यायला हवी असं मला वाटतं, त्यामुळे स्त्रीने स्त्रीच्या मताला दिलेला मान सफळ होण्यासाठी एक पाऊल तरी उचलले जाईल.

स्वयंपाक करायला घरात सकाळी ५ वाजता उठायचं, डब्बा बनवायचा, घरातलं आवरून मग ऑफिसला जायचं, पुन्हा ऑफिसमधून सुटताना रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी. घडयाळामध्ये जणु स्त्रीरूपी काटे फिरत असतात. म्हणजे एका बाजूला आपण पुढारत आहोत हे सिद्ध करायची धडपड  तर दुसरीकडे घरातल्या कामांवर आपलाच शिक्का मारल्यासारखी वागणूक म्हणूनच ही परिस्थिती बदलण्यासाठी मी मघाशी म्हणाले, गरज आहे फिरून नव्याने जन्मण्याची.

ऑफिसमध्ये किंवा बाहेरच्या ठिकाणी ‘ओ बाई’ असं कुणी म्हटलं तर आपला अहंकार दुखावतो. मॅडम म्हटलं की मान दिल्याचा समज असतो मग प्रत्यक्षात आपला मान सन्मान व्हावा यासाठी आपण प्रयत्न का करत नाही?

मैत्रिणींनो! साध्या साध्या गोष्टी आपण अगदी स्पष्टपणे आपल्या घरातल्यांशी, आपल्या जोडीदारासोबत शेअर केल्या तर आपल्याबरोबर कोणीतरी आहे याची जाणीव होईल. घरातली कामं, मुलांसंबंधी जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर काय हरकत आहे किंबहुना आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अर्थात आपण असमर्थ असं अजिबात नाही बरं का!

बाहेरच्या जगात  वावरताना प्रत्येकाला आपापली कामे नेमून दिलेली असतात त्या कामाच्या  जबाबदाऱ्या जशा स्त्री आणि पुरुष  दोघांवर असतात,तिथं कुठल्याही प्रकारे  लिंग  भेद नसतो मग घरी सुद्धा हाच न्याय असायला हवा.

स्त्री म्हणून खंबीर आणि कणखर होण्याची गरज आहे, पण या गोष्टी आपल्या कृतीतून दिसायला हव्यात. आज संसारात आपण नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावतोय मग त्या अनुषंगाने येणाऱ्या प्रत्येक गोष्टी समानतेने व्हायला हव्यात. जेव्हा या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्याला होईल आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला आपण सुरुवात करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्यात जागृती झाली असे म्हणता येईल. जेव्हा आपल्या कामामध्ये मदतीचे हात असतील, जेव्हा आपल्या मताला मान असेल तेव्हाच आपल्या अस्तित्त्वाचा विजय होईल.

Designed and Developed by SocioSquares