bad currency (1)

खराब नोटा बदलून घ्यायच्यात, तर हे वाचा!

बिझनेस किंवा नवा व्यापार हा खेळ खेळायत का कधी? खोट्या कागदी नोटा, नाहितर प्लॅस्टिकच्या चलन या खेळात दिले जायचे. खेळून खेळून कागदी नोटा फाटल्या किंवा प्लॅस्टिकचे चलन हरवले तरी चिंता नसायची. बाजारातून तोच गेम नव्याने आणला, की पुन्हा खेळ सुरु. पण, हा असा पर्याय ख-याखु-या व्यवहारात नसल्याने, धातूपासून तयार केलेली नाणी आणि कागदी नोटा ही चलने थोडी सांभाळून हाताळावी लागतात. नोटांचा कागद जाड, सहज न फाटणारा असतो मात्र प्रत्येकाचे वापरणे समान नसल्याने विविध त-हेने नोटा खराब होतात.
काही वेळा त्या भिजतात, दुमडण्याच्या रेषेवर फाटतात. कुणी त्यावर पेनाने लिहील्याने आकडे निटसे दिसत नाहीत, तर कधी पेनाची शाई पसरल्याने संपूर्ण नोट निळसर बनते. कुणीतरी नेमकं आपल्याला अशी नोटा चिटकवतं, तर आपणही अशा नोटांना मार्गी लावण्याची संधीच शोधत असतो. यापेक्षा डोक्याला जास्त ताण न देता खराब झालेल्या नोटा वापरण्याच्या यथायोग्य पद्धतींचाच अवलंब केला तर…

  1. सगळ्यात सोप्पा मार्ग म्हणजे, अशा नोटा बॅंकेत पैसे डिपॉझीट कराव्यात. या पद्धतीने नोटा अकाऊंटमध्ये जमा होतात व विड्रॉ करतेवेळी को-या किंवा व्यवहारासाठी योग्य अशा नोटा मिळतात.
  2. तसेच, कुठल्याही बॅंकेत खराब नोटा बदलून मिळू शकतात. बॅंकमध्ये अशा नोटा जमा करुन, त्याबदल्यात समान चलन किंमत असलेल्या नोटा आपल्याला मिळतात. कुठलीही बॅंक नोट बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही. पण, नोटची अवस्था तितकी बिकट आहे की नाही हे मात्र बॅंक कर्मचारी तपासून घेतील.
  3. नोट बदलून देण्याच्या बदल्यात बॅंक कुठलेही मूल्य आकारत नाही. ही सुविधा सर्वांसाठी विनामूल्य आहे.
  4. आणखी एक सोयीचा पर्याय आहे. अशा नोटा सरकारी कामांसाठी वापरण्यावर भर द्यावा. पाण्याचं बिल, लाईट बिल, घरपट्टी भरताना खराब नोटा जमा कराव्यात. कारण अप्रत्यक्षपणे या नोटा सरकारी विभागांतून बॅंकामध्ये जमा होतात.

नागरीकांच्या सोयीसाठी, देशातील व्यवहार सुरळीत सुरु रहावेत यासाठी नोटा बदलून देण्याची सुविधा अत्यावश्यक आहेच, पण त्याचबरोबर नागरीकांनी देखील चलनाचा जपून वापर करणे आवश्यक आहे. त्यावर पेन्सिलिने किंवा पेनाने काहीबाही नोंदवणे, नोटांना स्टॅपलर मारणे चुकीचे आहे. हा गुन्हा आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेऊया, चलनास आदरानं वागवूया.

More Articles
Designed and Developed by SocioSquares