suryy (1)

महिलांसाठी ‘सूर्यनमस्कार’!

आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी दिवसाची सुरुवात व्यायामाने व्हावी असे म्हटले जाते. सूर्यनमस्कार एक सहज सोप्पा व्यायाम प्रकार असून वेगवेगळ्या प्रकारच्या योगासनांची मालिकाच यामध्ये दिसून येते. दहा योगासने एकदम करवून घेणारा हा व्यायाम प्रकार रोज नियमित व योग्य पद्धतीने केल्यास त्याचे फायदे तुम्ही अनुभवू शकाल. स्वत:ची तब्येत चांगली ठेवण्याच्या ध्येयाने दिवसभरातील १५ मिनिटे आपण व्यायामासाठी नक्कीच देऊ शकतो! आधुनिक जीवनशैलीत शरीराच्या हालचाली कमी होत जाऊन बसल्या जागी कामे करण्याची यांत्रिकता आल्याने कमी वयातच विविध आजारांचा सामना करावा लागतोय. मधुमेह, ताण, शारीरिक क्षमतांचा अभाव, अन्न पदार्थांतील फास्ट फूड संस्कृती यासा-यांतून तुम्हाला निरामय आरोग्य मिळवून देणा-या सूर्यमस्कारामुळे स्नायूंची लवचिकता वाढते, मेद कमी होते, भूक आटोक्यात येते, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास देखील मदत करतो.
उन्हात उभे राहून सूर्यनमस्कार घातल्यास ‘ड’ जीवनसत्त्वाची प्राप्ती होते. जलद गतीने किंवा कमी गतीने सूर्यनमस्कार घातल्यास त्यानुसार होणारे फायदेही भिन्न आहेत. कुठलाही आजार नसणा-या व्यक्तिने दररोज साधारण २५ ते ३० सूर्यनमस्कार घालावेत, तर आजार असलेल्या व्यक्तिंनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने या व्यायामाचे संतुलन साधावे. ज्यांना सूर्यनमस्कार घालण्याची सवय नाही त्यांनी प्रथम योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाने तो शिकून घ्यावा, कारण योग्य प्रकारे सूर्यनमस्कार न घातल्यास हात, पाय किंवा पाठ दुखू शकते. प्रथम २ ते ३ सूर्यनमस्कारांनी सुरुवात करावी व दर आठवड्याला एक एक सूर्यनमस्कार वाढवत न्यावा. सकाळी कामावर किंवा कॉलेजसाठी निघण्याच्या घाईमध्ये, जर तुम्हाला वेळ मिळत नसेल, तर संध्याकाळी सूर्यनमस्कार घालू शकता. यासाठी वेळेचे नियोजन करताना जेवणानंतर किमान चार तासांनी सूर्यनमस्कार घालावा, तर सूर्यनमस्कारानंतर १५ ते २० मिनिटांनी जेवले तरी चालते.
पुरातन परंपरेची पार्श्वभूमी लाभलेल्या या सूर्यनमस्कारामुळे शरीराबरोबर मनाचेही स्वास्थ्य सुधारते. भारतीय संस्कृतीत सूर्योपासनेला जितके महत्त्व आहे तितकेच या व्यायाम प्रकारालाही आहे. निरोगी आरोग्यासाठी दिवसेंदिवस अधिक व्यस्त होत चाललेल्या दैनंदिन वेळापत्रकात सूर्यनमस्कारालाही स्थान द्यायलाच हवे!

More Articles
Designed and Developed by SocioSquares