नव्या वाटा धुंडाळण्यासाठी सज्ज व्हा !

‘मुलगी शिकली प्रगती झाली; एक स्त्री शिकली कि सगळं घर सुशिक्षित होतं’ ; ही वाक्ये आपण नेहमीच ऐकतो. आपण  स्त्रिया खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा देखील महत्त्वाचा भाग आहोत. जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील स्त्रियांच्या प्रगतीचे महत्त्व पटवून दिले होते.त्याची जाणीव आपण प्रत्येकीने ठेऊन सज्ज व्हायला हवे. मानसिकता, ताण, मर्यादा या सगळ्या गोष्टींचा विचार म्हणजे आपण आपल्यावरच घातलेली एक प्रकारची बंधने आहेत. ही बंधने झुगारून स्वतःला नव्या भूमिकेत प्रवेश करण्यासाठी स्वतःला स्वीकारले पाहिजे. जर आपण स्वतःला स्वीकारले तर इतर लोकं देखील आपल्याला सकारात्मकतेने स्वीकारतील. मेडिकल, संशोधन, खेळ, शिक्षण, अभिनय अशा सगळ्याच क्षेत्रात स्त्रियांनी आपला ठसा आणि छाप पाडली आहे. त्यांचा आपल्याला अभिमान असलयालाच पाहिजे;पण त्यात आपणही आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा. उंच माझा झोका म्हणत आपल्या कारकिर्दीला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या स्त्रीच्या प्रत्येक भूमिका या वंदनीयच आहेत.  रमाबाई रानडे, सावत्रीबाई फुले, राणी बंग, साधनाताई आमटे, मंदाकिनी आमटे, बानू कोयाजी, मेबेल आरोळे, या स्त्रियांनी नव्या वाटा शोधून आपले योगदान दिले तर काहींनी प्रवाहाविरोधात जाऊन आपले कार्य केले. स्त्रियांचा असा प्रेरणादायी इतिहास आपल्यापाशी आहे. त्यांच्याकडून आपण शिकले पाहिजे. मैत्रिणींनो ! स्त्री आणि समाज यांचा इतका निकटचा संबंध आहे.स्त्रियांच्या बाबतीत आज समाजाची मानसिकता आजही तितकीशी पुढारलेली नसली तरी आपण आपले स्थान निर्माण कसं करू शकू या दृष्टीने प्रयत्न हे व्हायलाच पाहिजेत.  आपल्याला येणाऱ्या गोष्टी देखील आपण इतरांना शिकवायला पाहिजेत. ज्ञान दिल्याने वाढते आणि आपली आणि समोरच्याची देखील प्रगती साधता येते त्यातून समाजाची देखील आपोआप प्रगती होऊ शकेल. स्त्रियांनी स्त्रियांसाठी घेतलेला पुढाकार हा सर्वार्थाने चौकट मोडू शकेल. साथ स्वतःला स्वतःची देताना दुसऱ्या स्त्रीसाठी देखील सहकार्याचे हात देणे हाच खरा स्त्रीधर्म आहे असे म्हणायला हरकत नाही. स्त्रियांच्या मनात एकमेकींबद्दल आकस असतो असं म्हटलं जात पण याला छेद देण्यासाठी आपल्यातल्या प्रत्येकीने पुढे आले पाहिजे. आपल्याच दुसऱ्या मैत्रिणीच्या यशामध्ये ज्ञानाचा दिवा होता आलं तर त्यापेक्षा जास्त आनंद कोणताच नाही. यात फार काही कठीण नसतं बरं का  ? जसं एखादी नवीन केलेली रेसिपी आपण एकमेकींशी शेअर करतो ना अगदी तसच आपल्याला येणाऱ्या गोष्टी देखील अगदी सहजपणे दुसऱ्याशी शेअर करता आल्या पाहिजेत.

मैत्रिणींनो! आपण ज्या  गोष्टींची भीती बाळगतो किंवा साशंकता ठेवतो त्या गोष्टी खरंतर तितक्या कठीण नसतात.म्हणूनच एकमेकांना सहाय्य केले पाहिजे.”एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” याप्रमाणे स्त्रियांनी स्त्रियांना देऊ साथ आणि करू समाजाचा विकास हे प्रत्यकीने आपल्या मनावर बिंबवलं पाहिजे.

Designed and Developed by SocioSquares