…अशी घडावीत आपली मुलं !

आपल्या समाजात कुटुंबव्यवस्था पूर्वापार रुजली आहे. संस्कार, नातेसंबंध, मैत्री यासगळ्यामध्ये आपले आयुष्य फिरत असतं. आपल्या जगण्यात मूल्यं आहेत. संध्याकाळी देवासमोर हात जोडून शुभंकरोति म्हणायचं, आपल्यापेक्षा वयानं मोठ्या लोकांना वाकून नमस्कार करायचा, सणासुदीला आपुलकीने शुभेच्छा द्यायच्या. या सगळ्याची पाळंमुळं आपल्या संस्कारात रुजलेली आहेत;पण आता हे संस्कार कुठेतरी हरवतं चाललेले आहेत. पूर्वी आजी-आजोबा छान छान गोष्टी सांगायचे. त्या गोष्टींमध्ये देखील जगण्यातली मूल्यं असायची. आज ते संस्कार देखील हरवत चालली आहेत. कशामुळे ? याची उत्तरं आपल्या आजूबाजूलाच आहेत. सोशल मीडियामुळे या सगळ्यावर अतिक्रमण केलं आहे; म्हणूनच आज मनापासून काही गोष्टी सांगायची इच्छा आहे. या माध्यमांतून त्या मी मांडू शकतेय याचा आनंद आहेच; पण तुम्ही त्याचा उपयोग आपल्या जगण्यात आणि आपल्या मुलांच्या देखील जगण्यात बाणवावा असं मनापासून वाटतंय.

सुशिक्षितपणाचा बुरखा आपण इतका पांघरलेला आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी क्षुल्लक वाटू लागतात. मुलाने परदेशी जावं, पैसा कमवावा आणि इथे आपण डॉलरच्या मोठमोठ्या गोष्टी करण्यात धन्यता मानावी ही आपली मानसिकता झाली आहे; पण या स्पर्धेमध्ये वेगवान होताना आयुष्याच्या शाळेतही पास होण्याचा प्रयत्न हा व्हायलाच हवा.

म्हणूनच आपल्या मुलांच्या बाबतीत संस्कारांचा प्रश्न येतो तेव्हा मात्र आपण संकुचित विचार करतो. इंग्लिश मिडीअम स्कुल, कॉलेजमध्ये गेल्यावर नोकरी कशी मिळेल आणि त्याचाच विचार करून कुठल्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे विचार, नोकरी लागल्यावर त्याच्या पगाराचा आकडा हा मोठाच असला पाहिजेत असा अट्टाहास आणि त्यामुळे चाललेला सगळा खटाटोप आणि त्यातून होणारा संघर्ष याचा बळी आपल्या मुलांना बनवू नका.

स्पर्धेमध्ये धावताना आपल्या मुलांच्या पायाखालची जमीन सरकत तर जात नाही ना याची खबरदारी मुलं लहान असल्यापासूनच आपण घेतली पाहिजे.मुलं म्हणजे चिखलाचा गोळा. त्याला आपण जसा आकार देऊ तशी ती घडत जातात म्हणूनच आपल्या संस्कारांच्या बळावर त्यांचं व्यक्तिमत्त्व घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. आपली प्रगती साधताना सगळ्यांच्या सोबतीने पुढे जाण्यात खरे समाधान आहे. स्वकेंद्री होऊन आपण स्वतःची प्रगती साधू शकत नाही. हे आपल्या मुलांच्या देखील मनावर लहानपणापासून बिंबवायला पाहिजे.

स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारे लोकं काही कमी नाहीत; पण त्या शिक्षणाला संस्काराचा बाज असला की त्याला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त होऊ शकेल यादृष्टीनेच आपल्या मुलांना तयार करा.

मैत्रिणींनो! बाहेरच्या जगाचे आपल्याला चांगले वाईट अनुभव येतच असतात; पण तो एक जगण्यातला भाग आहे. परिस्थितीशी झगडण्यासाठी कधीकधी कठोर व्हावं लागतं; पण त्यातच आपला खऱ्या अर्थाने संयमाचा आणि संस्काराचा कस लागतो. ते संस्कार आणि त्यांचं महत्त्व आपण पालक म्हणून समजून घेतले पाहिजेत आहे आपल्या मुलांना देखील शिकवून त्याचा पायंडा पाडला पाहिजे.

Designed and Developed by SocioSquares