01

तुझ्या स्वप्नांना दे नवसंजीवनी!

मैत्रिणीनों! झी मराठी जागृतीच्या वेबसाईटवरील ‘अमृतवाणी’ हा माझा ब्लॉग म्हणजे तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची सुवर्णसंधी असते माझ्यासाठी! यावेळी मी तुमच्याशी हितगुज करणार आहे ते तुमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर, म्हणजेच सध्या झी मराठी जागृती आयोजित करीत असलेल्या प्रशिक्षण वर्गांबाबत!! शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यशाळांचे आयोजन करुन जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झी मराठी जागृती करीत आहेच! मी या प्रशिक्षण वर्गांना भेट देते तेव्हा तुमचा नव्या गोष्टी शिकण्याचा उत्साह आणि स्वत:ला सक्षम बनविण्याची जिद्द पाहून भारावून जायला होतं.

बहुतांश स्त्रियांना स्वयंपाकाची आवड असतेच आणि त्यात लोणची, जॅम तसेच चॉकलेट्सच्या चविष्ट रेसिपीज तज्ञांकडून शिकायला मिळणार म्हणजे तर पर्वणीच! हल्ली जगभरातील पदार्थांची माहिती देणारी पुस्तके उपलब्ध असली, तरी प्रत्यक्ष पदार्थ बनवताना पाहिल्यास तो अधिक छान समजतो व लक्षात रहातो, जसे आपल्या आईला जेवण बनवताना पाहून आपण स्वयंपाक शिकलेलो असतो. घरातील जेवणाचे व्यवस्थापन सांभाळण्यासोबत मुलांचे शाळेचे प्रोजेक्ट्स मोठ्या कुशलतेने बनवतेस, म्हणून तर ह्या कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्यात आनंदाने रमतेस! ग्लासवरील पेंटिंग किंवा प्लॅस्टिकच्या रांगोळीवरील नक्षीकाम करताना तुझ्यातील कल्पकतेला उभारी देतेस. स्वत:ला नवी दिशा देण्यासाठी रोजच्या धावपळीला थोडी विश्रांती देऊन अशा छंदांना मोठे रुप देण्यासाठी प्रयत्नशील रहायलाच हवे. व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी आवश्यक असणारा स्वत:वरील विश्वास जिंकण्याची प्रकिया जेव्हा येथील प्रशिक्षक समजावतात, तेव्हा खरेच आत्मविश्वास कमविण्याचा जणू नवा मार्ग उमजतो!

बदलत्या समाजातील अघोरी शक्तिंना सामोरे जाताना कुणाच्याही मदतीची आस न धरता, आता आपल्यालाच पदर खोचून दोन हात करायला हवेत, यासाठी आवश्यक असणारे स्वसंरक्षाचे प्रशिक्षण तर घ्यायलाच हवे. घरातील कामे, ऑफिस या सा-यामुळे कराटे किंवा ज्युडोचे संपूर्ण कोर्स करणे शक्य नसते अशावेळी स्वसंरक्षणाच्या काही नेमक्या खुबी शिकून घ्यायलाच हव्यात, ज्या आपल्याला स्वावलंबी बनवतील. अशाप्रकारे, शारीरिक व मानसिक बाजू सक्षम असण्यासोबत आर्थिक बाजूही भक्कम असायला हवी. घरातील व्यवहार सांभाळताना तुझा हिशोब अगदी चोख असतो, पण सोबत भविष्यकालीन गुंतवणूकीच्या पर्यांयांची तंतोतंत माहिती असणे देखील आवश्यक आहे. प्रशिक्षण वर्गांद्वारे व्यवहारातील छोटे बारकावे समजून घेण्यास मदत होईल.

अशाप्रकारे, संपूर्ण विकास साधायचा असेल, तर एक प्रभावी सुरुवात करायलाच हवी. नव नव्या गोष्टी शिकून घेण्याची ही पहिली पायरी तुम्ही यशस्वीरित्या पार करताय, आता इथेच न थांबता व्यवहारिक दृष्टिकोन घडविण्यावर भर देऊ. स्वप्न पाहाण्यासोबत आता ते पुर्णत्वास नेण्याचे धाडसही करायलाच हवे!!

Designed and Developed by SocioSquares